दापोली : तालुक्यातील केळशी व मांदिवली सजाचा अतिरिक्त कार्यभार असलेले ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी राजेंद्र उंडे यांना 20 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे.
‘एसीबी’कडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी व शेरा देण्याकरिता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजेद्र उंडे, सजा केळशी अतिरिक्त पदभार मांदिवली यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 जून रोजी 20 हजार रुपयांची मागणी केली. ही लाच रक्कम 10 जून रोजी स्वीकारणाचे मान्य केले होते. त्यानुसार मागणी केलेले 20 हजार रुपये ग्राम महसूल अधिकारी उंडे यांनी 10 जून रोजी पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र उंडे यांना मंगळवारी दुपारी 2.30 वाजता पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले.
याबाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलिस अधीक्षक संजय गोवीलकर, सुहास शिंदे, पोलिस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक उपनिरीक्षक चांदणे, पोलिस कॉन्स्टेबल संजय वाघाटे, विशाल नलावडे, श्रेया विचारे, दीपक आंबेकर, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर, पोलिस नाईक प्रशांत कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी मंडणगड येथेही मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर दापोलीतदेखील महसूल विभागातील तलाठी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. लाचेची पाठोपाठ प्रकरणे घडत असतानाही महसूल विभाग यातून धडा घेताना दिसत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महसूल विभागाची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे.