

खेड : तालुक्यातील तळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगेश शिर्के यांचा मुलगा सोहम मंगेश शिर्के (वय 15) याचा 13 जून रोजी विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाला. वेळेवर उपचार मिळाले असते तर हा निष्पाप जीव वाचू शकला असता, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर तळे प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.
सोहमने नुकतीच दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली होती. त्याच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्याचा अंत्यविधी शुक्रवारी कासारवाडी येथे पार पडला. तळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुमारे 15 गावांना आरोग्य सेवा पुरवते. या केंद्रासाठी 2 कोटी रुपये खर्चून आरोग्य केंद्राची इमारत आणि 50 लाख रुपये खर्चून डॉक्टरांचे निवासस्थान बांधण्यात आले असूनही तेथे अद्यापही एमबीबीएस डॉक्टर नियुक्त नाहीत. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
ग्रामस्थांच्या मते आरोग्य केंद्रामध्ये ओपीडी सेवा केवळ दुपारी 1 वाजेपर्यंतच असते आणि त्यानंतर कोणताही डॉक्टर उपलब्ध राहत नाही. शेतीच्या हंगामात सर्पदंश आणि विंचूदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. मात्र अशावेळी प्राथमिक आरोग्य सुविधा अपुरी ठरत असल्यामुळे ग्रामीण भागातील जीव धोक्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाशिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे, उपतालुखा प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ, अस्तान विभाग प्रमुख किरण मोरे, सागर मोगरे, विभाग प्रमुख फुरूस गट प्रमुख उपस्थित होते. त्यांनी जर आठ दिवसांत तळे आरोग्य वर्धिनी केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नेमले गेले नाहीत तर ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न मोरे यांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा मुलगा कोणत्याही मोठ्या आजारामुळे नव्हे, तर साध्या विंचूच्या दंशामुळे गेला आहे. वेळेवर डॉक्टर उपलब्ध असते तर सोहम वाचला असता. याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्रामस्थांनी आरोग्य विभाग व प्रशासनाने तातडीने पावले उचलून वैद्यकीय सेवा सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.