

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओझरखोल दरम्यान एसटी बस आणि मिनी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांतील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
रत्नागिरी - चिपळूण एसटी बस (एमएच 20 बीएल 4038) आणि चिपळूणहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी मिनी बस (एमएच 08 एपी 4527) यामध्ये सायंकाळी सुमारे 5.30 च्या दरम्यान समोरासमोर अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिनी बसचा चालक हा गाडीच्या केबिनमध्ये अडकला होता. दोन्ही बसना जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून प्रवासी बाहेर काढावे लागले. अडकलेल्या प्रवाशांना अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे पाठवण्यात आले आहे.
या अपघातामध्ये किरण रहाटे (मिनी बस चालक), अतुल पांडुरंग पिटले (सावर्डे), आशिष प्रमोद विभुते देवरुख (मिनी बस क्लिनर), तनवी (पूर्ण नांव समजले नाही) (चिपळूण), सायली संतोष हेगडे (निवळी), अनिश अनिल कोळंबे, आयुष संजय मयेकर (मिर्या रत्नागिरी), मंगेश विजय दुधाणे (एसटी बस वाहक), सचिन बाबासाहेब केकान (ओझरखोल), संतोष तानाजी गायकवाड, रामचंद्र फेपडे, रघुनाथ पाठक, राजू चोचे, शेखर सतीश साठे, सुशील धोंडीराम मोहिते, सरिता धोंडीराम मोहिते, अजय रामदास भालेराव, अनुराधा शिवाजी धनावडे, विनय विश्वनाथ प्रसादे, सुशील दत्ताराम मोहिते, उमामा मुल्लाजी, अनिकेत अनंत जोगले, किरण राठी, रामचंद्र बाबू, वैशाली सिद्धार्थ सावंत, अहर्ता संतोष सावंत, केतन श्रीकृष्ण पवार, सिद्धार्थ गोपाळ सावंत, सारा हबीब फकीर, अण्णा बाबासाहेब पवार हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर जोयशी, विनय मनवल, कोलगे, वांद्रे, खडपे वाहतूक शाखेचे पोलीस मुजावर, स्थानिक ग्रामस्थ आदीनी सर्वप्रकारची मदत उपलब्ध करून दिली.
महामार्गावर डायव्हर्शनचे सूचनाफलक योग्य पद्धतीने नसल्यामुळे अपघात होत आहेत. तसेच महामार्गावर डायव्हर्शन योग्य ठिकाणी न घातल्याने वारंवार अपघात होत असून या समस्येकडे महामार्ग ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.