

रत्नागिरी: दिवाळीसण अवघ्या काहीच दिवसांवर आहे. नागरिकांकडून दिवाळीची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कालवधीत एसटी बसेसला मोठी गर्दी होत असते. सुट्ट्यांमुळे कोणी गावी तर कोणी देवदर्शन, पर्यटनाला जात असतात. याचाच विचार करून राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास योजनेच्या भाडेदरात कपात केली आहे. त्यामुळे सवलतधारक व विविध प्रवाशांना आवडेल तेथे प्रवास योजनेतून राज्यभर प्रवास करून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
आवडेल तिथे प्रवास या योजनेत दर वाढवल्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे याचाच विचार करून महामंडळाने भाडेदरात किमान 225 ते 1254 रूपयापर्यंत कपात केली आहे. दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांना 15 ते 20 दिवस सुट्ट्या आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलती देण्यात येत असतानाच आता दिवाळी सणानिमित्त आवडेल तिथे प्रवास योजना दरात कपात केल्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे. चार किंवा सात दिवसांची सवलत असणार आहे. सुरूवातीच्या दरात कपात केल्यामुळे प्रवाशांचे पैसे वाचणार आहे तसेच एसटीत प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.
आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत प्रौढ व मुलांसाठी चार दिवस आणि सात दिवसांचा सवलत पास दिला जातो. साधी, जलद, शिवशाही, शिवनेरी, ई-शिवाई गाड्यांसाठी हा पास ग्राह्य धरला जाईल.
पास काढण्यासाठी रत्नागिरी आगारासह विविध आगारातून व महामंडळाच्या अॅपवर प्रवाशांना सवलतीचा पास ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने पास काढता येणार आहे.