

रत्नागिरी : रत्नागिरी विभागातील बसेसची दुरवस्था झालेली आहे. कित्येक बसेस भंगारात गेल्या आहेत, तर काही बसेस भंगारात जाणार आहेत. आहे त्या गाड्यांवर रत्नागिरी विभागाची वाहतूक सुरू आहे. सध्या रत्नागिरी विभागात साधी एसटी बसेस, ई-बसेस नंतर आता शिवशाही बसेसचाही खेळखंडोबा झाला आहे. बसेस सतत ब्रेकडाऊन होवून मध्येच बंद पडत आहेत. रविवारी सकाळी 10 वाजता प्रवाशांनी खचाखच भरलेली चिपळूण-रत्नागिरी शिवशाही बस ही बस मध्येच बंद पडली आणि 12 वाजता रत्नागिरीत पोहोचणारी बस तब्बल दोन तास उशिराने पोहोचली. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
शिवशाही बसेसमधील चालक-वाहक हे प्रवाशांना उद्धट भाषा वापरत आहेत. त्यामुळे अशा चालक-वाहकांवर एसटी प्रशासनाने कारवाई करावी तसेच जिल्हांतर्गत प्रवासात ही चांगल्या बसेस सोडाव्यात अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी विभागातील एसटी बसेसची संख्या कमी झाल्यामुळे खराब बसेस सध्या एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे साधी, ई-शिवाई बसेस मध्येच बंद पडल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. रविवारी सकाळी दहा वाजता चिपळूणमधून रत्नागिरीकडे निघालेली शिवशाही बस कामते येथे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. आगार प्रमुखांना संपर्क करून दुसरी गाडी पाठवण्याची विनंती करण्यात आली. एक तासाने दुसरी गाडी आली. मात्र साधी अन दुरवस्था झालेली एसटी बस पाठवली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. चालकाला जाब विचारल्यास चालक उलट प्रवाशांना उद्धट व बेजबाबदार भाषा वापरत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
एकंदरीत, नादुरूस्त, खराब बसेस मार्गावर सोडत असल्यामुळे जिल्हांतर्गत प्रवासाला आता वारंवार ब्रेक लागत आहे. राजापूर, लांजा नंतर आता चिपळूण मार्गावर ही ब्रेकडाऊनची समस्या वाढली आहे. रत्नागिरीचे विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी याकडे लक्ष देवून जिल्हांतर्गत चांगल्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.