

खेड : तालुक्यातील कोरेगाव-संगलट रस्त्यावर गुरुवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेत शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे व दैव बलवत्तर ठरल्याने सुमारे 25 विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड आगारातून सुटणारी एसटी बस नेहमीप्रमाणे शेरवलीत वस्तीला जात होती. पहाटे 6 वाजता ती पुन्हा संगलट-कोरेगाव मार्गे खेडकडे प्रवासी, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर प्रवासी घेऊन निघाली. दरम्यान कर्जी गावाच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्या वाळूच्या डंपरने एसटीला जोरदार हूल दिली. अपघात टाळण्यासाठी एसटी चालकाने गाडी बाजूला घेतली, पण त्यावेळी बस रस्त्यालगत केबल टाकण्यासाठी खोदलेल्या चरामध्ये ती अडकली. त्यामुळे 50 फूट दरीत कोसळण्यापासून एसटी थोडक्यात बचावली. या घटनेमुळे प्रवाशांचा जीव वाचला असला तरी पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाळूवर बंदी असताना डंपर खुलेआम धावत कसे? असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला आहे.
दरम्यान, दापोली तालुक्यातून कर्जीतून मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचे समजते. या अवैध वाहतुकीबाबत वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी करूनही महसूल विभाग व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. आजचा हा अपघात टळला असला तरी एसटीतील 20 ते 25 विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अशा चोरट्या वाळू वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.