

रत्नगिरी : उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे पर्यटन, बाहेरगावी जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रत्नागिरी विभागाचे वेळापत्रक बिघडले आहे. रणरणत्या उन्हात चटके खात तसेच घामाने हैराण होवून प्रवासी एसटीची वाट पाहत असून मोठी गर्दी होत आहे. तासनतास एसटी वेळेत न आल्यामुळे नाईलाजास्तव प्रवासी खासगी वडाप, मिनी बस, चारचाकीचा आधार घेत रत्नागिरी गाठत आहेत.
एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे म्हणून बसेस वेळेत सोडा, जादा बसेसचे नियोजन करा, तोटा भरून काढा असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले होते. तसेच नफा आणि तोट्यात असलेले विभागांची नावे जाहीर केली होती. रत्नागिरी विभाग तोट्यात आहे. एकीकडे एसटी बसेसची संख्या कमी झाली आहे. चालक, वाहकांची संख्या नसल्यामुळे एकालाच दोन ते तीन ड्यूटी करावी लागत आहे. दुसरीकडे प्रवाशांची गर्दी वाढत आहे.त्यामुळे ऐन उन्हाळी सुट्टी, सणासुदीत एसटीचा बोजवारा उडतो. वेळापत्रक बिघडते, उन्हाचे चटके सहन करीत, घामाने त्रस्त होवून प्रवासी एसटीची वाट पाहतात मात्र बसेस वेळेवर येत नसल्यामुळे नोकरदार, व्यापारी, पर्यटक, सामान्य प्रवासी प्रचंड संतापले आहेत.
एकाच एसटीत १२० हून अधिक प्रवासी कोंबतात
तासनतास उभारून एसटी वेळेवर येत नसल्यामुळे सर्वच बसस्थानक, मार्गावर प्रवाशांची गर्दी होते. त्यातच एक एसटी आल्यानंतर त्याचएसटी मध्ये मोठी गर्दी होते. अक्षरशा १२० ते १३० प्रवासी कोंबल्या जातात आणि प्रवास केला जातो. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. विशेषता राजापूर, लांजा, चिपळूण, देवरूख, संगमेश्वर या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते.