

रत्नागिरी ः शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गतिमंद विद्यार्थ्याला तेथील अन्य एका मनोरुग्णानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर डेरवण येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मारहाणीची ही घटना शुक्रवार 6 जून रोजी सकाळी 11 वा. सुमारास घडली असून पालकांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात बुधवार 11 जून रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मन्नान मुनाफ फणसोपकर (23, रा. राजीवडा नाका, कौशल्या प्लाझा, रत्नागिरी) असे मारहाण करण्यात आलेल्या गतिमंद मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई शरिफा मुनाफ फणसोपकर (45, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मन्नान हा टीआरपीजवळील आविष्कार शाळेत शिकत आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्याने तो घरीच होता. या कालावधीत तो घरात चिडचिड करत असल्याने त्याच्या पालकांनी त्याला 25 मे रोजी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, 6 जून रोजी त्याला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी मन्नानच्या जबड्याला दोन ठिकाणी जबर मार लागल्याने फ्रॅक्चर झाल्याचे त्याच्या पालकांना सांगितले.मन्नानची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्या पालकांनी त्याला तातडीने अधिक उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केले आहे. तक्रारीनंतर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 117(1),(2)115(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या विनंतीवरुन मन्नानवर डेरवण येथे मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांमध्ये काहीवेळा आपआपसात चेष्टा मस्करीही चालू असताना ते अचानकपणे चिडखोर होउन अशा हाणामारीच्या घटना घडू शकतात. मन्नान हा आपल्या घरीही चिडचिडपणा करत असल्यामुळेच त्याच्या पालकांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार केल्यानंतर तो शांत होता. परंतु मनोरुग्ण हे कधीही चिडखोर होउ शकतात त्यामुळे त्यांच्यात आपआपसात मारहाणीच्या घटना घडतात. रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना कधीही मारहाण करत नाहीत. उलट यापूर्वीही मनोरुग्णांनीच रुग्णालयातील कर्मचारी तसेच वैद्यकिय अधिकार्यांना देखील मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
- डॉ. संघमित्रा फुले, अधीक्षक, जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालय
अन्य एका मनोरुग्णानेच मन्नानला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीत कोणत्याही वस्तूचा वापर करण्यात आलेला नाही. मनोरुग्ण असलेल्या वॉर्डमध्ये कोणत्याही वस्तू ठेवण्यात येत नाहीत कारण मनोरुग्ण त्या वस्तूंचा वापर करून आत्महत्या करण्याचीही शक्यता असते. एका वॉर्डमध्ये साधारणपणे 20 मनोरुग्ण ठेवण्यात येतात. त्यांच्यावर रुग्णालयातील दोन कर्मचारी?खिडकीतून सतत लक्ष ठेवून असतात.