

रत्नागिरी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रत्नागिरी, चिपळूणसह खेड, दापोली, राजापूर या शहरांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रशासकीय पातळीबरोबरच विविध संस्था, राजकीय पक्षांनीही महाराजांना अभिवादन केले.
रत्नागिरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांमध्ये जयंती साजरी करण्यात आली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी महाराजांची महती वर्णन करीत त्यांची थोरवी गायली.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर आणि माळनाका येथील शिर्के उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती रोषणाई करण्यात आली होती. शिर्के उद्यानात प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी रत्नागिरीकरांनी उपस्थित लावत महाराजांना अभिवादन केले.
रत्नागिरीसह चिपळूणमध्येही विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. नव्याने उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती सजावट करण्यात आली होती. नगर पालिका कार्यालयाच्या प्रांगणातील पुतळ्याचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवरायांचे पुतळ्यांचे पूजन करुन अभिवादन केले.