

मळगाव : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-केरवाडी येथे रविवारी पहाटे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारी बोट उलटली. या दुर्घटनेत बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण समुद्रात फेकले गेले. यात दोघे थोडक्यात बचावले तर एक मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राजन सारंग (४६) असे बेपत्ता मच्छिमाराचे नाव आहे.
शिरोडा केरवाडी येथील मच्छिमार प्रकाश सारंग हे मुलगा दाजी सारंग आणि भाऊ राजन सारंग हे तिघे जण रविवारी पहाटे बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असतानाच अचानक समुद्रात सोसाट्याचा वारा सुटला आणि या वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे त्यांची मच्छिमारी बोट समुद्रात भरकटून उलटली व बुडाली. दरम्यान समुद्रात पडलेले प्रकाश सारंग आणि मुलगा दाजी सारंग यांनी बोटीवरील ऑईल कॅनचा आधार मिळाला. याच दरम्यान जवळून जाणाऱ्या दुसऱ्या एका मच्छिमारी होडीवरील मच्छीमारांनी प्रकाश सारंग आणि दाजी सारंग या पिता-पुत्राला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत प्रकाश सारंग यांचे भाऊ राजन सारंग हे खोल समुद्रात बुडाले असून, ते अद्याप बेपत्ता आहेत.