

खेड : तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी तसेच पतसंस्था मर्यादितमध्ये झालेल्या लेखापरीक्षणात तब्बल 4 कोटी 22 लाख 81 हजार 021 रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण 16 जणांविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विनोद वामनराव अंड्रस्कर (वय 54, रा. वर्धा) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 1 एप्रिल 2023 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत तसेच लेखा परीक्षणपूर्व कालावधीत संबंधित पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणात बनावट मुदतठेव पावत्या छापून ठेवीदारांची सुमारे 43 लाख 20 हजार 412 रुपयांची फसवणूक करण्यात आली, तर विविध अनियमित व्यवहारांमुळे संस्थेचे 3 कोटी 79 लाख 60 हजार 609 रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात एकूण अपहारित रक्कम 4 कोटी 22 लाख 81 हजार 021रुपये आहे, असे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2.24 वा. खेड पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दत्ताराम बाळा बैंकर (अध्यक्ष), सुधाकर रामभाऊ शिंदे (उपाध्यक्ष), दत्तराम भिकू धुमक (सदस्य), बाबाराम केशव तळेकर (सदस्य), दीपक केशव शिगवण (सदस्य), सुरेश कृष्णा पडयाळ (सदस्य), सखाराम सोनू सकपाळ (सदस्य), तुकाराम रामु साबळे (सदस्य), तेजा राजाराम बैंकर (सदस्य), रेवती चंद्रकांत खातु (सदस्य), मुरलीधर दत्तात्रय बुरटे (सदस्य), सुभाष भिकु शिंदे (सदस्य), शशीकांत नथुराम शिंदे (माजी उपाध्यक्ष), प्रिया योगेश सुतार (माजी मुख्य कार्यकारी अधिकारी), अभिजीत रमेश नलावडे (कॅशियर), 16) रुपेश चंद्रकांत गोवळकर (लिपिक) यांच्या विरोधात कलम 420, 409, 406, 120(च), 34, 467, 465 तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या हित संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील ठेवीदारांमध्ये तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण असून पुढील चौकशी सुरू आहे.