Ratnagiri News| गणवेशाची प्रतीक्षा अखेर संपली; जिल्‍ह्याला २ कोटी ८० हजारांचा निधी

एसएनए स्‍पर्श प्रणालीद्वारे जिल्‍ह्यातील शाळांना निधी वितरित; शालेय समितीमार्फत लवकरच गणवेशाचे होणार वाटप
Ratnagiri Zilla Parishad
Ratnagiri Zilla Parishad
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : जिल्‍हा परिषदेच्‍या शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले, अद्याप विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळाला नव्‍हता. दरम्‍यान, जिल्‍ह्यासह राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या शाळांमधील १ ली ते ८ वीच्‍या विद्यार्थ्यांना दुसरा शालेय गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून दुसऱ्या गणवेशासाठी जिल्‍हास्‍तरावर निधी उपलब्‍ध करून देण्यात आला आहे. रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेला २ कोटी ८० हजारांचा निधी आला आहे. तो निधी शाळांना वितरित करण्यात आला आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील ६० हजार ४७६ विद्यार्थ्यांची दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा अखेर संपली असून, शालेय समितीमार्फत लवकरच गणवेश वाटप होणार असल्‍याचे सांगण्यात आले.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात राज्‍यात इयत्ता १ ली ते ८ वीतील ४१ लाख पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्‍या पहिल्‍याच दिवशी, अर्थात १५ जून रोजी दोन शालेय गणवेशाऐवजी केवळ एक गणवेश देण्यात आले होते.

दुसऱ्या गणवेशासाठी शासनाकडून अनुदान प्राप्‍त न झाल्‍याने शाळा सुरू होवून तीन महिने पूर्ण झाले तरी विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत होती. दुसऱ्या गणवेशासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्‍ध करून द्या, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर तीन महिन्‍यानंतर २ कोटी ८० हजारांचा निधी जिल्‍ह्याला मिळाला आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबरच बूट, सॉक्‍स मिळणार आहेत.

प्रति विद्यार्थी ३०० रुपये

दुसऱ्या शालेय गणवेशासाठी प्रति विद्यार्थी ३०० रुपये याप्रमाणे निधी जिल्‍हा स्‍तरावर उपलब्‍ध झाला आहे. त्‍याचबरोबर पहिल्‍या गणवेशाच्‍या अनुदानातील शिल्‍लक २० टक्‍के रक्‍कम, म्‍हणजेच प्रति विद्यार्थी ६० रूपये याचेही अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्‍यामुळे समितीमार्फत विद्यार्थ्यांना आता शालेय व्‍यवस्‍थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश उपलबध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पहिल्‍या गणवेशाच्‍या दर्जाबाबत १० शाळांना नोटिसा, कारवाई कधी?

जिल्‍हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी गणवेश देण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्‍या गणवेशांच्‍या कापडाचा दर्जा अत्‍यंत निकृष्ट असल्‍याचे प्रयोगशाळेच्‍या अहवालातून स्‍पष्ट झाले आहे. त्‍यामुळे शिक्षण विभागाने जिल्‍ह्यातील १० शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्‍या आहेत; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. त्‍यामुळे दुसरा गणवेश तरी मुलांना चांगला द्यावा, अशीच मागणी पालकांमधून होत आहे.

जिल्‍हा परिषद विद्यार्थ्यांच्‍या दुसऱ्या गणवेशासाठी २ कोटी ८० हजारांचा निधी आला आहे. तो निधी वितरित करण्यात आला आहे. मुलांना लवकरच दुसरा गणवेश मिळणार आहे.
- मनीषा जगदाळे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.