

खेड : शहरानजीक भोस्ते मार्गावर मंगळवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा जगबुडी नदीवरील पुलाच्या भोस्ते गावाकडील बाजूला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही बस एम.आय. बी. शाळेची असल्याचे समजते. जगबुडी नदीवरील पुलाजवळ ही बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला कलंडली. बसमध्ये सुमारे 25 विद्यार्थी होते. या भीषण घटनेत सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
भोस्तेकडून खेडकडे येणारी खासगी स्कूल बस अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूला झुकली व कडेला जाऊन अर्धवट कलंडली. ही घटना जगबुडी नदीच्या पुलाजवळ घडल्याने काही अंतर पुढे गेली असती, तर बस थेट नदीत कोसळून जीवितहानीचा धोका होता. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी वेळीच धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत खेड परिसरात स्कूल बसच्या अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हाच चौथा अपघात असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बहुतेक शाळा खासगी चालकांच्या नादुरुस्त वाहनांवर विसंबून विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी खचा खच भरले जात असून आरटीओ, स्थानिक पोलिस आणि महामार्ग पोलीस यांच्याकडून याकडे अद्यापही गंभीरपणे पाहिले गेलेले नाही. स्थानिक नागरिक आणि पालक वर्गाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधून घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.