

सावंतवाडी ः महाराष्ट्र शासनाकडून बिलापोटी देण्यात येणार्या 37 कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात खाजगी कंपनीकडून सुरू असलेली सिटीस्कॅन यंत्रणा शुक्रवार पासून बंद करण्यात आली आहे. परिणामी रुग्णालयात शुक्रवारी सिटीस्कॅनसाठी आलेल्या रुग्णांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे लवकरात-लवकर ही यंत्रणा चालू होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न व्हावे, अशी मागणी रुग्णांतून होत आहे.
राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कृष्णा डायग्नोसिस या कंपनीला सिटीस्कॅन एक्स-रे मशीन चालवण्याचे कंत्राट दिले आहे. या कामाचे आरोग्य विभागाकडून बिल अदा केले जातेे, परंतु राज्य शासनाकडून गेल्या काही महिन्यांचे बील कंपनीला अदा झाल्याने कंपनीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू आपली मोफत सिटीस्कॅन सेवा शुक्रवारपासून बंद केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील या सिटीस्कॅन सेवेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले होते. या वर्षभरात तब्बल 9 हजार हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला होता.
बिल अदा करण्याबाबत कंपनीकडून राज्य शासनाकडे तब्बल सात वेळा स्मरणपत्र पाठवण्यात आले, मात्र राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेरीस कंपनीने सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन आणि एक्स-रे सेवा बंद केली आहे. याचा फटका रूग्णालयात सिटीस्कॅन साठी येणार्या गोरगरीब रुग्णांना बसला.शुक्रवारी रूग्णालयात सिटीस्कॅनसाठी आलेल्या रूग्णांना माघारी परतावे लागले. त्यातील सिटीस्कॅनची तत्काळ गरज असलेल्या रूग्णांना खाजगी केंद्राकडे धाव घ्यावी लागली. यात त्यांची आर्थिक व मानसिक परवड झाली. आता उपजिल्हा रूग्णालयातील ही सुविधा पूर्ववत होई पर्यंत गोरगरीब रूग्णांची अशीच परवड होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य रुग्णांना विनामूल्य सेवा उपलब्ध होण्यासाठी समस्येवर तात्काळ तोडगा काढावा व येथील सिटीस्कॅनसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून होत आहे.