Ratnagiri News : सौंदळमध्‍ये आढळले अश्मयुगीन कातळशिल्प

इतिहास अभ्यासक विनोद पवार यांच्‍या शोधामुळे राजापुरातील प्रागैतिहासिक वारशात आणखी भर
Ratnagiri News
सौंदळमध्‍ये आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
Published on
Updated on

राजापूर : तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ परिसरात इतिहास अभ्यासक तथा पत्रकार विनोद पवार यांना अश्मयुगीन कालखंडाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण मानवाकृती कातळशिल्प आढळून आले आहे. या शोधामुळे राजापूर तालुक्यातील प्रागैतिहासिक वारशात आणखी एका महत्त्वपूर्ण स्थळाची भर पडली आहे.

पन्हाळे माळवाडी परिसरातील जांभ्या दगडाच्या सड्यावर हे कातळशिल्प आढळून आले. सुमारे चार फूट उंच व तीन फूट रुंद असलेली ही मानवाकृती दोन्ही हात बाजूला पसरलेल्या अवस्थेत कोरलेली असून ती दगडात अंदाजे एक इंच खोलीपर्यंत खोदलेली आहे. दूरून पाहिल्यास एखाद्या व्यक्तीची सावलीच कातळावर उमटली असल्याचा भास या आकृतीमुळे होतो. या कातळशिल्पाचा शोध लागल्यानंतर परिसराची पाहणी, स्वच्छता व प्राथमिक दस्तऐवजीकरणाचे काम करण्यात आले. या संशोधन मोहिमेत पराग पारकर, वरद पवार, वरुण जाधव, यश इंगळे आणि समर्थ आबवले यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीमुळे कातळशिल्प पूर्णपणे उघडकीस आणणे व त्याची नोंद घेणे शक्य झाले.

कोकणातील कातळशिल्पे ही प्रागैतिहासिक मानवाच्या जीवनशैली, श्रद्धा, निसर्गाशी असलेले नाते आणि ज्ञानपरंपरेची साक्ष देणारी मानली जातात. पन्हाळे तर्फे सौंदळ येथील ही मानवाकृती देखील अशाच प्राचीन वारशाचा भाग असण्याची शक्यता असून या स्थळाचा पुरातत्त्वीय आणि शास्त्रीय अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. इतिहासप्रेमी, संशोधक आणि पुरातत्त्व अभ्यासकांनी या स्थळाला भेट देऊन सखोल अभ्यास करावा, तसेच शासनाच्या संबंधित विभागांनी या वारशाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news