

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील गजानन मोघे (वय 53) या शिक्षकाचे ज्ञानदानाचे काम करत असताना चाफवली शाळा नंबर 1 येथेच हृदयविकाराच्या झटक्याने शाळेतच निधन झाल्याची घटना सोमवारी घडली.
चाफवली शाळा क्र. 1 मध्ये स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाल्यानंतर ज्ञानदानाचे काम करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराच्या झटक्यामुळे ते जाग्यावरच खुर्चीवर पडले, काय झाले हे मुलांना कळेना. या प्रकाराने मुले गोंधळून गेली आणि त्वरित इतर शिक्षकांना सांगितले. इतर शिक्षकांनी त्वरित रिक्षा बोलावून त्यांना उपचारासाठी देवळे येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी इमर्जन्सी म्हणून पाली येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवले; मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. गजानन मोघे यांनी सतत दोन वर्ष चाफवली शाळेतील दोन विद्यार्थ्यांना नासा इस्रोसाठी निवड होण्यास मोठे योगदान दिले. गजानन मोघे यांच्या सारख्या प्रामाणिक, मधाळ वाणी, प्रेमळ, नाथ पै यांच्या गुरू मार्गातील शांत, संयमी, हुशार, कवी अशा व्यक्तीला देवळे पंचक्रोशी मुकली आहे.