

Ratnagiri sword attack case Saitavade convict sentenced
रत्नागिरी: तालुक्यातील वाटद खंडाळा येथे साडेचार वर्षांपूर्वी वाहतुकीचे चलन न दिल्याच्या वादातून तलवारीने वार केल्या प्रकरणी दोषी आरोपीला न्यायालयाने आज (दि.२७) शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषीला १० वर्ष सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. योगेश अनंत सावंत (रा. सैतवडे, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात संदेश सुरेश पवार (वय ३०, रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) याने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संदेश हा वाटद-खंडाळा येथील साहस ट्रान्सपोर्ट कंपनी येथे सुपरवायजर म्हणून कामाला होता. तर योगेश हा त्याठिकाणी चालक म्हणून कामाला होता. 8 नोव्हेंबर 2020 रोजी योगेशने माल वाहतुकीचे चलन ट्रान्सपोर्ट कंपनीत जमा केले नव्हते. त्यामुळे संदेशने योगेशला फोन करुन चलन जमा करण्यास सांगितले. त्यावरुन त्यांच्यात फोनवरच बाचाबाची होउन योगेशने मी थोड्या वेळात कंपनीत येऊन चलन जमा करतो, असे सांगितले होते.
त्यानुसार त्याच रात्री कंपनीबाहेर संदेश पवार आणि त्याच्या सोबत कंपनीतीलच संकेत गुरव व अंबादास शिरसाट हे तिघे योगेशची वाट पाहत थांबले होते. काही वेळाने योगेश दुचाकीवरुन तिथे आला व चलनाच्या कारणावरुन पुन्हा संदेश सोबत त्याची बाचाबाची झाली. त्यांच्यातील वाद तेथेच असलेल्या संकेत आणि अंबादास यांनी सोडवला. त्यानंतर योगेश दुचाकीवरुन निघून गेला होता.
परंतू, त्यानंतर काही वेळाने तो पुन्हा दुचाकीवरुन तिथे आला आणि त्याने शर्टाच्या आतमध्ये लपवून ठेवलेली तलवार बाहेर काडून संदेशवर उगारली. संदेश मागे हटल्यामुळे तलवारीचा वार त्याच्या कपाळावर होउन तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर योगेशने पुन्हा तलवार उगारली असता बाजुलाच असलेल्या अंबादासने त्याला पकडले. तेव्हा योगेशने त्याच्यावरही तलवार उगारली असता त्याने तो वार चुकवला. या प्रकारानंतर सर्वांनी तिथून पळ काढला होता.
या घटनेत जखमी झालेल्या संदशने स्वतःवर उपचार करुन घेतल्यानंतर जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन आरोपी योगेश सावंतवर भादंवि कायदा कलम 307 अन्वये तसेच हत्यार अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक रायसिंग पाटील यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड.अनिरुध्द फणसेकर यांनी 10 साक्षीदार तपासात केलेला युक्तिवाद प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी ग्राह्य मानला. त्यांनी आरोपीला भादंवि कलम 307 मध्ये 10 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड तसेच हत्यार अॅक्ट मध्ये 3 वर्ष शिक्षा आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.