Ratnagiri News : बॉक्साईट उत्खननाविरोधात सागवेवासीयांची निर्णायक लढाई

भूमी, जलसंपदा, शेती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आता सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन
bauxite mine
bauxite mine, प्रातिनिधी छायाचित्र
Published on
Updated on

राजापूर : तालुक्‍यातील सागवे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट खनिज उत्खननाच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले असून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सागवेकरांनी आता सर्वपक्षीय एकजुटीची हाक दिली आहे. गावची जमीन, पाणीसाठे, शेती आणि नैसर्गिक पर्यावरण धोक्यात येऊ नये, तसेच भविष्यातील पिढ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी रविवार, ३० ऑगस्ट रोजी जनता विद्यालय, सागवे येथे सर्वपक्षीय विरोध सभा आयोजित करण्यात आली असल्‍याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे राजापूर तालुकाध्यक्ष कमलाकर कदम यांनी दिली.

बॉक्साईट उत्खननासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीचा वापर झाल्यास त्याचा स्थानिक शेतीवर काय परिणाम होईल, डोंगर भागातील नैसर्गिक जलस्रोत आणि भूजलपातळीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता किती, तसेच उत्खननानंतर परिसराच्या पर्यावरणीय समतोलावर होणारे परिणाम याबाबत स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

विकास हवा; मात्र गावाच्या अस्तित्वाच्या किमतीवर नको

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होणार असेल तर त्याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. शेती, पाणी आणि पर्यावरण हे केवळ आजच्या पिढीचे साधन नसून पुढील पिढ्यांचीही संपत्ती आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना स्थानिक नागरिकांचा आवाज आणि त्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली जात आहे.

सागवे परिसरातील नागरिकांकडून बॉक्साईट उत्खननाबाबत प्रशासनाकडून संपूर्ण माहिती, प्रकल्पाचा पर्यावरणीय परिणाम, स्थानिक जमीन व जलस्रोतांवरील संभाव्य परिणाम आणि स्थानिकांच्या हक्कांबाबत स्पष्टता मागितली जाण्याची शक्यता आहे. ही लढाई कोणत्याही एका पक्षाची नसून सागवेच्या अस्तित्वाची आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याची आहे, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे. बॉक्साईट उत्खननाला विरोध करण्यासाठी भविष्यातील दिशा आणि आंदोलनाची भूमिका या सभेत निश्चित होण्याची शक्यता आहे. भूमी वाचली तर शेती वाचेल, पाणी वाचले तर गाव वाचेल आणि पर्यावरण वाचले तर भविष्यातील पिढी सुरक्षित राहील, या भावनेतून सागवे परिसरातील नागरिक या सभेकडे पाहत आहेत.

आजची सभा ठरणार महत्त्वाची

या पार्श्वभूमीवर रविवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता जनता विद्यालय, सागवे येथे होणारी सर्वपक्षीय विरोध सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सभेला सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news