

चिपळूण : तालुक्यातील कामथे येथील धरणात टँकरद्वारे सांडपाणी सोडल्याचा ठपका असलेल्या गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीचे उत्पादन सोमवारपासून पूर्णपणे बंद झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली दहा दिवसांची स्थगिती शनिवारी उठल्यानंतर सोमवारी एमआयडीसीने या उद्योगाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईने औद्योगिक क्षेत्रासह कामगार तसेच परिसरातही खळबळ उडाली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे धरणात 21 जूनच्या रात्री टँकरद्वारे सांडपाणी सोडले. ग्रामस्थांच्या मदतीने पाचपैकी 2 टँकर अडवले, तर 3 टँकर घटनास्थळावरून भरधाव वेगात निघून गेले. पोलीस प्रशासनाने हे दोन्ही टँकर ताब्यात घेऊन पंचनामा केला असता हे टँकर साफयिस्ट कंपनीतून आले असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. मात्र, या प्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने उद्धव ठाकरे सेनेच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस स्थानकात धडक देत अधिकार्यांना जाब विचारला. तिसर्या दिवशी कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बजावण्यात आली.
या नोटिसीत कंपनीवर विविध ठपके ठेवण्यात आले. त्यासाठी साफयिस्ट कंपनीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेशही महावितरण व एमआयडीसीला देण्यात आले. दरम्यान, उत्पादन प्रक्रिया सुरू असल्याने ती पूर्ण होण्यासाठी कंपनीने केलेल्या विनंतीनुसार पुढील 24 तासात केलेल्या कारवाईला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा दिवसांसाठी स्थगिती दिली. त्याबाबतची माहिती एमआयडीसी आणि महावितरण कंपनीला मंडळाकडून देण्यात आली. दरम्यान, शनिवारी स्थगिती उठल्यानंतर सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीने कंपनीचा पाणीपुरवठा खंडित केला. त्यामुळे कंपनीचे उत्पादन पूर्णपणे थांबले आहे. गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत ज्या काही कंपन्या शिल्लक आहेत, त्यामध्ये साफयिस्ट ही मोठी कंपनी आहे. या कंपनीत 350 हून अधिक कामगारवर्ग आहे. त्यामुळे सोमवारी उत्पादन थांबल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता उत्पादन थांबले असल्याचे सांगण्यात आले.