

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू असून पुलांच्या जोडरस्त्यांच्या कामांना वेग मिळालेला नाही. त्यात जोडरस्त्याचा भराव करण्यासाठी नदीमधील गाळ उपसून टाकला जात आहे. बावनदीमध्ये तर नदीत रस्ता करुन जेसीबीने गाळ खणून काढल्याचा प्रकार सुरू असून प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम संगमेश्वर ते लांजापर्यंत अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यातही संगमेश्वर ते बावनदी दरम्यान पाच ते सहा ठिकाणी काम सुरू आहे. त्यातच संगमेश्वर आणि बावनदी, कोळंबे याभागात पुलांच्या भरावाचे काम हाती घेण्यात आले आहे. बावनदीच्या जोडरस्ता भरावासाठी थेट बावनदीमध्येच खड्डे खणले जात आहेत. बावनदीच्या पात्रात रस्ता करून जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात असून हा गाळ भराव म्हणून रस्त्याला वापरला जात आहे.
हा गाळ काढण्याची परवानगी प्रशासनाने ठेकेदाराला दिली आहे का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. बावनदीमध्ये पुलापासून काही भागात गाळ उपशामुळे मोठे खड्डे पडले आहेत. भविष्यात गुरे घेऊन जाणारे किंवा मच्छीमारीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थासाठी हे खड्डे धोकादायक ठरणार आहेत. प्रशासनाचे अधिकारी याठिकाणाहून नियमित येत जात असतात, परंतु याकडे कानाडोळा केला जात असल्याचे या भागातील ग्रामस्थांचे मत बनले आहे.