Ratnagiri : प्रादेशिक नळपाणी योजनेच्या गतीला ब्रेक

पाईपलाईन टाकताना अनेक ठिकाणी जागेचा प्रश्न; टाक्यांसाठीही जागेचा अडथळा
Ratnagiri News
प्रादेशिक नळपाणी योजनेच्या गतीला ब्रेक
Published on
Updated on

रत्नागिरी : जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी शहरासह रत्नागिरी तालुक्यातील मिर्‍या, शिरगावसह 34 गावांसाठीच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची गती कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पूर्ण झालेल्या कामाचा सुमारे 11 कोटींचा मोबदला न मिळाल्यामुळे, तसचे अनेक ठिकाणी टाक्यांसाठी जागा उपलब्ध नसल्याने आणि हातखंबा ते मिर्‍या पर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूने जागा संपादन केली नसल्याने पाईपलाईन टाकायची कुठून, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत रत्नागिरी शहरासह रत्नागिरी तालुक्यातील 34 गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी ही योजना पालकमंत्री उदय सामंत यांनी हाती घेतली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात येणार्‍या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे 1 लाख 86 हजार 205 व्यक्तींना म्हणजेच 2022 च्या लोकसंख्येनुसार प्रतिमाणशी 55 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत अनेक महत्त्वाच्या कामांची प्रगती झाली आहे. वळके येथे जॅकवेल व पंपगृह तळघराचे काम पूर्ण झाले आहे. पाण्याची उचल क्षमता वाढली आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जमीन उपलब्ध झाली आहे, मुख्य अभियंत्यांच्या मान्यतेने प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नळजोडणी व साठवण टाक्यांच्या कामांमध्येही प्रगती आहे. पानवल झोनमधील जुगाईनगर, आपकरेवाडी आणि होरंबेवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायतींकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. खेडशी झोनमध्ये खेडशी-चांदसूर्या, डफळचोलवाडी, खेडशी-भंडारवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम सुरू आहे. खेडशी-महालक्ष्मी मंदिर, खेडशी-द्वारकानगर (पोमेंडी बु.) आणि खेडशी-आदिशक्तीनगर (पोमेंडी बु.) येथील टाक्यांच्या छताचे काम पूर्ण झाले आहे. नावडेवाडी सिंटेक्स टाकी, रवींद्रनगर कुंभारवाडी, मिरजोळे-नवीन वसाहत आणि कुंभारवाडी येथील कामेही पूर्ण झाली आहेत.

नाचणे येथे मुख्य संतुलन साठवण टाकीच्या तिसर्‍या टप्प्याचे बांधकाम सुरू आहे. करबुडे झोनमध्ये मुळगाव आणि धनावडेवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. तिसर्‍या टप्प्यातील कामाची सुरुवात झाली आहे. निवळी झोनमध्ये मालपवाडी येथील मुख्य संतुलन टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. या व्यतिरिक्त मिरजोळे, घवाळेवाडी-मिरजोळे आणि नाचणे येथेही उंच साठवण टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जुवे येथे जमिनीच्या उपलब्धतेबाबत अडचण असली तरी यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. शिरगाव, उद्यमनगर आणि साईभूमिनगर-मिरजोळे येथील छताचे काम पूर्ण झाले आहे. जाकीमिर्‍या आणि सडामिर्‍या व आनंदनगर येथील छताचे काम पूर्ण झाले आहे. नवीन कामांपैकी निवळी-तेलीवाडी आणि कोकजेवाडी येथे सिंटेक्स टाक्यांसाठी जागा उपलब्ध झाली आहे, परंतु ग्रामपंचायतींकडून नाहरकत मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पाईपलाईन व गुरुत्ववाहिनी टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. एकूण 118.10 किमी गुरुत्ववाहिनीपैकी 75 किमी गुरुत्ववाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. इतर कामांसाठी ग्रामपंचायतींचे सहकार्य अपेक्षित आहे. योजनेसाठी आवश्यक असणार्‍या काही ठिकाणी, विशेषतः अ‍ॅप्रोज रोडवरील ग्रामपंचायतींकडून जागेच्या उपलब्धतेबाबत अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी टाक्यांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ते काम थांबले आहे. ठेकेदाराचे झालेल्या कामाचे सुमारे 11 कोटी रुपये येणे आहे. त्यामुळे योजनेच्या कामाचा वेग मंदावला आहे. त्यात हातखंबा ते मिर्‍या पर्यंत महामार्गाच्या बाजूने भूसंपादन न केल्यामुळे पाईपलाईन टाकण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अनेक अडचणी योजनेसाठी निर्माण होत आहेत. अशा ठिकाणी प्रशासकीय स्तरावर चर्चा करून मार्ग काढण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news