

रत्नागिरी : अंत्योदय रेशनकार्डधारकांना आता धान्याबरोबरच महिलांसाठी मोफत साडीचे वाटप केले जाणार आहे. गेल्यावर्षी 28 हजार 163 महिलांना रेशन दुकानातून साड्याचे वाटप करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी तब्बल 34 हजार 610 महिलांना साडी वाटप होणार आहे. लग्नसराई, सणासुदीच्या दिवसात शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील हजारो गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी मोफत साडी वाटप करण्याचा निर्णय झाला होता. शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत एक साडी प्रति कुटुंब ही योजना राबवली जाते. या योजनेनुसार अंत्योदय योजनेतील महिलेला साडी दिली जाते. ही योजना पिवळे रेशन कार्ड असलेल्या समाजातील अत्यंत गरीब आणि निराधार या घटकांसाठी आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून सर्वसामान्यांना कपड्यांचा खर्च करणे मोठे अवघड होत आहे. अशा काहात मोफत साडी मिळाल्याने गरीब महिलांचा खर्च वाचणार आहे. दरम्यान, साडी वाटप प्रक्रियेत पारदर्शकात राहावी यासाठी रेशन दुकानावर अंगठा लावल्यानंतरच धान्याप्रमाणेच साडीची नोंद होऊन ती लाभार्थ्याला दिली जाणार आहे.
गतवर्षी 28 हजार 163 साड्यांचे वितरण
जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने गतवर्षी अंत्योदय कुटुंबातील 28,163 महिलांना 74 टक्के साड्यांचे वाटप वितरण रेशनदुकानातून करण्यात आले होते. यंदा 34 हजार 610 साड्यांची मागणी असून त्या लाभार्थ्यांना वाटप होणार आहे.