

रत्नागिरी : गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून सरकारने रॉकेल पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्रास बाजारपेठेत सध्यातरी केरोसीनवर चालणारे स्टोव्हच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेशनवर मिळणाऱ्या रॉकेलचा उपयोग नेमका होणार कुठे? असा सवाल नागरिक करीत आहेत. ज्यांच्याकडे स्टोव्ह आहे त्यांची सोय झाली; मात्र ज्यांच्याकडे स्टोव्ह नाही त्यांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पूर्वी घराघरांत केरोसीनवर चालणारे स्टोव्ह हे स्वयंपाकघरातले अविभाज्य घटक होते. चहा बनवण्यापासून ते दैनंदिन स्वयंपाकापर्यंत स्टोव्हचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. हॉटेल खानावळीतही ते हमखास दिसत होते. पूर्वी स्टोव्हची विक्री होत होती मात्र रॉकेल बंद झाल्यापासून स्टोव्ह विक्री अत्यल्प झाली आहे. कालांतराने गॅस शेगड्या, इलेक्ट्रिक उपकरणे आणि इंडक्शन कुकटॉपसारखे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध झाल्याने स्टोव्ह हळूहळू कालबाह्य झाले आहे. लाखो नागरिकांनी गॅसला पसंती दिल्यामुळे स्टोव्ह वापर बंद झाले. एकवेळी ग्रामीण भागात काही ठिकाणी स्टोव्ह मिळेल, मात्र शहरात तर वापर बंदच झाले आहे. आता गॅस तुटवड्यामुळे पुरवठा विभाग रॉकेल देणार आहे. त्यामुळे रॉकेल मिळेल पण स्टोव्हचे काय असा सवाल नागरिक करत आहे.
स्टोव्हच्या किमती वाढल्या
2017-18 नंतर स्टोव्हचा वापर थांबवल्याने काहीजणांचे स्टोव्ह भंगारात गेले तर काहीजण जपून ठेवले आहे. असे असले तरी बाजारात स्टोव्हची विक्री कमी प्रमाणात आहे. सध्यस्थितीत पितळी स्टोव्हची किंमत अडीच हजार, लोखंडी स्टोव्ह 700 रूपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत आहे. असे असले तरी बाजारात स्टोव्ह विक्री होताना दिसत नाही.