

खेड : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीजखांब, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर, वाढीव वीजबिले आणि रखडलेली रस्त्याची कामे यांसह विविध प्रश्नांवर चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) राजवेल येथे महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत वीजखांब बदलणे, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरची समस्या सोडविणे आणि रखडलेले रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
राजवेल येथे मेहमूद दाऊद हमदुले यांच्या निवासस्थानी सायंकाळी ही बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वप्नील पाटील, शाखा अभियंता नीलेश माळी तसेच महावितरणचे अभियंता वेळमकर व बडगुजर यांच्यासह खाडीपट्टा विभागातील सुमारे १५० प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. खाडीपट्टा विभागाला वीजपुरवठा करणारी मुख्य वीजवाहिनी यापूर्वी समुद्र किनार्यालगतच्या शेतजमिनींवरून नेण्यात आली होती. ही वाहिनी रस्त्याच्या बाजूने खांब उभारून नेण्याचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने हरकत घेतल्यामुळे ते थांबविण्यात आले होते. या प्रश्नावर दोन्ही विभागांच्या अधिकार्यांमध्ये चर्चा झाली.
रस्त्यावर तसेच गटारांमध्ये असलेले खांब हटवून रस्त्याच्या बाजूला योग्य ठिकाणी उभारण्याबाबत चर्चा करून रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याचे ठरविण्यात आले. खाडीपट्टा विभागातील पन्हाळजे, होडकाड, सवणस, आमशेत, तांबे मोहल्ला यांसह विविध गावांमध्ये वीजखांब नादुरुस्त झाले असून काही ठिकाणी ते धोकादायक स्थितीत आहेत. होडखाड येथील दत्तवाडी परिसरातील वीजखांबांचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. हे खांब तत्काळ तपासून आवश्यकतेनुसार बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. महावितरणच्या अधिकार्यांनी वीजखांबांबाबत आलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने पुढील १० दिवसांत समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तांबे मोहल्ला येथील नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासह अन्य गावांतील नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरची समस्याही सोडविण्याबाबत चर्चा झाली.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी संबंधित अभियंते व वायरमन वेळेत प्रतिसाद देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वायरमन उपलब्ध करून द्यावा, वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि पन्हाळजेपर्यंतच्या गावांतील ग्राहकांशी अधिकार्यांनी नियमित संपर्क ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
शिर्शी येथील एका शेतकर्याला अनेक दिवसांपासून वीजपुरवठा मिळत नसल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला. वीजपुरवठा नसल्यामुळे शेतातील झाडांना पाणी देता येत नसून त्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. शेतकर्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक साहित्य उपलब्ध करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिले वाढून येत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. मीटर नादुरुस्त झाल्यास त्याची तपासणी कोण करणार, तसेच प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा अधिक बिल आकारले जात असल्यास त्याचे निराकरण कसे होणार, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
सध्या पथदीप सायंकाळी ७ वाजता सुरू करून सकाळी ६ वाजता बंद केले जातात. मात्र, सकाळी ६ वाजता परिसरात अंधार असल्याने शाळकरी विद्यार्थी, कामासाठी बाहेर पडणारे नागरिक व इतर ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. पथदीप सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन द्यावे, असे महावितरणच्या अधिकार्यांनी सांगितले.
खाडीपट्टा विभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. सुसेरी ते पन्हाळजे तसेच चिंचघर ते बहिरवली या मार्गांवरील रस्त्यांच्या कामाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. चिंचघर ते बहिरवली या सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे टेंडर झाले असून हे काम १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वप्नील पाटील यांनी सांगितले.