Ratnagiri News : राजापुरात बंदरासह जहाज बांधणी प्रकल्पाला गती

तुळसुंदेत १०० एकर जागेत साकारणाऱ्या प्रकल्पाचे मंत्रालयात सादरीकरण; सहकार्य करण्‍याच्‍या ना. नितेश राणे यांच्‍या प्रशासनाला सूचना
Ratnagiri News
राजापुरात बंदरासह जहाज बांधणी प्रकल्पाला गती
Published on
Updated on

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथे प्रस्तावित असलेल्या राजापूर बंदर आणि जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाशी संबंधित आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता करून काम वेगाने पुढे नेण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रकल्पाची माहिती देताना राजापूर तालुक्यातील तुळसुंदे परिसरात बंदर व जहाज बांधणी प्रकल्पासाठी सुमारे १०० एकर जागा निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी तसेच प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून आवश्यक त्या परवानग्या व सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले.

यावर प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी तातडीने दूर करून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी प्रशासनाला दिल्या. तुळसुंदे येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे स्वरूप व्यापक असणार आहे. केवळ व्यापारी जहाज वाहतुकीसाठी बंदर विकसित करण्याबरोबरच जहाजांची निर्मिती आणि दुरुस्ती यांसारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक सुविधा येथे विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर मालवाहतूक, साठवणूक आणि इतर पूरक व्यवसायांनाही या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

राजापूरसारख्या भागात एवढा मोठा प्रकल्प उभा राहिल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याबरोबरच औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. बंदर विकासाला गती देणे आणि त्या सोबतच स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार निर्माण करणे, हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुळसुंदे येथील प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामाला गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मंत्री नितेश राणे यांनी दिली. या उच्चस्तरीय आढावा बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह बंदरे विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news