

राजापूर : शासनाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरवणे या योजनेंतर्गत राजापूर शहरातील विविध भागातील 47 विकास कामांना 6 कोटी 18 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या माध्यमातून व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या विशेष पाठपुरावा व प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिली.
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामही लवकरच मार्गी लावून शहरवासीयांना 24 तास मुबलक पाणीपुरवठा करण्याचा आमदार किरण सामंत यांचा संकल्प लवकरच पुर्णत्वाला जाणार असल्याचेही काझी यांनी सांगितले.राजापूर शहरातील विकास कामांना शासनाकडून निधी मिळावा यासाठी आमदार किरण सामंत हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. तर राजापूरच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी यापुर्वीच राजापूरवासीयांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला असून भविष्यातही शहराच्या विकासाला नगरसेवकांच्या माध्यमातून निधी दिला जाणार असल्याची माहितीही हनिफ काझी यांनी दिली आहे.
शासनाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत हा 6 कोटी 18 लाखांचा निधी मंजूर झाल्याचे काझी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी राजापूर नगर परिषदेला हा निधी मंजूर झाल्याचे कळवल्याचे काझी यांनी सांगितले.
या निधीतून शहारातील विविध प्रभागांतील 47 विकास कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रभा क्रमांक एक मध्ये नदीपात्रात रस्ता व गणेश घाट बांधणे 20 लाख, कोंढेतड गणेशघाट सुशोभिकरण करणे 20 लाख, तालीमखाना तलाव ते अशोक मारणकर घर रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लाख, कुंभारमळा ते नदीपात्रात संरक्षण भिंत बांधणे 20 लाख, वैकुंठ भूमी येथे धार्मिक कार्यासाठी शेड बांधणे 20 लाख, कोंढेडत कब्रस्तान येथे सुशोभिकरण करणे 25 लाख, कोंढेतड मांड ते बौध्दवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लाख, लक्ष्मी केशव मंदिराच्या खालील बाजूस गणेशघाट बांधणे 25 लाख, बाग काझी कब्रस्तान सुशोभिकरण करणे 20 लाख अशा महत्वपूर्ण कामांसह शहरातील विविध भागातील रस्ते, संरक्षण भिंत व अन्य सुशोभिकरणाच्या कामांचा यात समावेश आहे. लवकरच ही कामे सुरू केली जाणार असून यामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. तर नवीन डीपीआर प्रमाणे सुरू असलेल्या शहरातील पाणीपुरवठा योजनेचे कामही लवकरच मार्गी लागणार असून शहरवासीयांवरील पाणीटंचाईचे संकट लवकरच दूर होणार असल्याचेही काझी यांनी सांगितले.
राजापूर शहरातील विविध विकास कामांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल काझी यांनी शहरवासीयांच्यावतीने आभार मानले आहेत.