Konkan Railway : गाड्या वाढल्‍या, तरी कोकणवासीयांच्‍या पदरी निराशाच

राजापूर स्थानकावर अनेक सुविधांची वानवा; गाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न, पोस्ट बुकिंग सेवा बंद
Konkan Railway
Konkan Railway
Published on: 
Updated on: 

शरद पळसुले-देसाई

राजापूर : कोकण रेल्वे कोकणातून धावू लागली, गाड्यांची संख्या वाढली, प्रवासाच्या सुविधांमध्येही काहीप्रमाणात सुधारणा झाली. मात्र, कोकण रेल्वेच्या प्रवासात कोकणवासीयांच्या पदरी अपेक्षित लाभ पडला का, हा प्रश्न आजही कायम आहे. मुंबईसह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना स्थानिक स्थानकांवर थांबा नाही, स्थानकांवरील मूलभूत सुविधांची वानवा, अपुऱ्या छतांची व्यवस्था, बंद करण्यात आलेली पोस्ट बुकिंग सेवा आणि अन्य पायाभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत. कोकणातून रेल्वे धावत असली तरी रेल्वेच्या सुविधांमध्ये कोकणापेक्षा दक्षिणेकडील भागाला अधिक प्राधान्य मिळत असल्याची टीका वारंवार होत आहे.

‘कोकण रेल्वे’ नाव असलेल्या या मार्गावर कोकणवासीयांच्या प्रश्नांकडेच दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. विसाव्या शतकातील मोठी अभियांत्रिकी किमया म्हणून कोकण रेल्वेकडे पाहिले जाते. कोकणाची भौगोलिक रचना पाहता, या भागातून रेल्वे धावेल, अशी कल्पना अनेक वर्षांपूर्वी कुणी मांडली असती तर त्यावर विश्वास ठेवणेही कठीण झाले असते. एका बाजूला आकाशाला भिडणारे डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या, नद्या, खाड्या आणि असंख्य अडथळे अशा निसर्गरचनेतून रेल्वेमार्ग उभारणे हे मोठे आव्हान होते. मात्र, कोकण रेल्वेचे शिल्पकार ई. श्रीधरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या जोरावर हे आव्हान पेलले. कोकणात रेल्वे आलीच नाही, तर ती वेगाने धावूही लागली. या रेल्वेमुळे कोकणातील दळणवळणाला नवी दिशा मिळाली.

कोकण रेल्वेला तीन दशकांहून अधिक काळ लोटला असला, तरी कोकणवासीयांचे रेल्वेसंदर्भातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. त्यात तळकोकणातील राजापूर तालुक्याचाही समावेश आहे. कोकणात रेल्वे यावी यासाठी संसदेत सातत्याने आवाज उठवणारे माजी खासदार बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते आणि रेल्वेच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा राजापूर लोकसभा मतदारसंघाशी संबंध कायम राहिला आहे.

पूर्वी राजापूर लोकसभा मतदारसंघाच्या नावाने संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या या भागातून कोकण रेल्वेसाठी मोठा संघर्ष झाला. रेल्वे कोकणात आली; मात्र राजापूर तालुक्याच्या रेल्वे प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळाला का, याचे उत्तर आजही समाधानकारक नाही. राजापूर तालुक्यात राजापूर रोड हे नियमित रेल्वे स्थानक, तर सौंदळ हे हॉल्ट स्थानक आहे. दोन्ही स्थानकांच्या समस्या मात्र वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. राजापूर रोड रेल्वे स्थानक शहरापासून तसेच तालुक्यातील अनेक गावांपासून दूर असल्याने प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो. स्थानक कायमस्वरूपी असून फलाट आणि काही मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तरीही प्रवाशांच्या गरजेनुसार सुविधांचा विस्तार होणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, ओणी-अणुस्कुरा मार्गावरील सौंदळ हे हॉल्ट स्थानक आहे. येथे गाड्यांना जेमतेम एक-दोन मिनिटांचा थांबा मिळतो. स्थानकावरील सुविधा, गाड्यांचे थांबे आणि प्रवाशांच्या सोयीसंदर्भातील अनेक मागण्या सातत्याने होत आहेत. मात्र, कोकण रेल्वे प्रशासनाकडून या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना स्थानिक प्रवाशांमध्ये आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट कार्यालयांत उपलब्ध असलेली पीआरएस (पोस्ट रिझर्व्हेशन सर्व्हिस) सेवा ही महत्त्वाची सुविधा होती. पोस्ट कार्यालयातून रेल्वे तिकिटांचे आरक्षण सहज करता येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र, कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने अडचणींचा मुद्दा पुढे करत ही सेवा बंद केली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वरसह राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी सातत्याने मागणी होत आहे. मात्र, अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही. डिजिटल सुविधा उपलब्ध असतानाही ग्रामीण प्रवाशांसाठी प्रत्यक्ष आरक्षणाची सोय बंद झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

आमदार किरण सामंत यांनी घेतली दखलराजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी नुकताच मतदारसंघातील रेल्वे स्थानकांचा दौरा करून तेथील समस्या जाणून घेतल्या. स्थानकांवरील सुविधा, प्रवाशांच्या मागण्या आणि विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. आमदार सामंत यांनी रेल्वेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातल्याने राजापूर तालुक्यातील रेल्वे स्थानकांचा विकास आणि प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा तालुकावासीय व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.