

राजापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राजापूर तालुक्यामध्ये वाटूळ, पाचल आणि नाणार, इंगळवाडी अशा तीन ठिकाणी प्रत्येकी एकेक नव्याने मतदार केंद्र वाढविण्यात आली असून त्यामुळे तालुक्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या 195 झाली आहे. दिनांक 1 जुलै 2025 च्या मतदार यादीनुसार राजापूर तालुक्यात 1लाख 20हजार 704 मतदार असून त्यामध्ये 63 हजार 756 महिला तर 56 हजार 948 पुरुष मतदार असणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला जिल्हा परिषदेसाठी सहा लाख तर पंचायत समितीसाठी साडेचार लाख रुपये खर्चाची मर्येादा रहाणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत बारा पंचायत समितीचे गण यांचा समावेश असून काही दिवसांपूर्वी या गट आणि गण यांच्या आरक्षणाची निश्चिती झाली आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवार पासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून निवडणुकीबाबत माहिती दिली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजापूर तालुक्यात यापूर्वी 192 मतदान केंद्रे होती. त्यामध्ये आणखी तीन नवीन मतदान केंद्रे वाढवण्यात आली असून वाटुळ, पाचल आणि नाणार, इंगळवाडी अशा तीन ठिकाणी प्रत्येकी एकेक केंद्र नव्याने असणार आहेत. त्यामुळे आता तालुक्यात 195 केंद्रे असतील. तालुक्यातील अणुस्कुरा, पन्हळे तर्फे सौन्दळ, आणि धारतळे येथे स्थिर सर्व्हे पथक स्थापन करण्यात येणार आहेत. फिरती पथके देखील असणार आहेत. आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जैसमिन यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, अर्ज पडताळणी, अर्ज मागे घेणे, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी याबाबत माहिती दिली. 16 पासून अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू होत असून ती प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. रविवारी सुट्टी असल्याने त्यादिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराला सहा लाख तर पंचायत समितीसाठी उमेदवाराला साडेचार लाख खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली असून राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयात मतदान साहित्य वाटप निवडणूक यंत्रणेला केले जाणार आहे. मतदान यंत्रे तेथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार असून 7 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून आबासाहेब मराठे महाविद्यालयातच मतमोजणीला सुरवात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी दिली. 1 जुलै 2025 च्या मतदार यादी नुसार राजापूर तालुक्यात 1 लाख 20 हजार 704 मतदार असून त्यामध्ये 63 हजार 756 महिला तर 56हजार 948 पुरुष मतदार आहेत, अशीही माहिती देण्यात आली.