

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाळ्याप्रमाणे ढगाळ वातावरण होते. संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस कोसळला. लांजा, नाणीज, पाली येथे रिमझिम पाऊस पडला. मात्र उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात कुठेच पाऊस झालेला नसला तरी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
संगमेश्वर तालुक्यात दुपारी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. तालुक्यातील देवळे परिसरात झाडे उन्मळून पडली. दुपारनंतर पावसाने देवळे परिसरात सुरुवात केली. हाच पाऊस देवरुख, संगमेश्वर, आरवली परिसरात जोराने पडला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील इतर अनेक भागांतही पावसाने प्रचंड धूमशान घातले असून ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या जोरदार वारा व पावसामुळे आधीच संकटात असलेला आंबा बागायतदार पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे खबरदारी अनेक भागांतील वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल, असा अंदाज होता; परंतु दिवसभर उन्हाचे चटकेच बसत होते. लांजातही सायंकाळी ६ वाजता रिमझिम पाऊस पडला. राजापुरात मात्र कुठेच पाऊस नव्हता. त्याचबरोबर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण होते; परंतु कुठेही पाऊस पडल्याची नोंद नाही.