Ratnagiri Rain : जगबुडी धोक्याच्या पातळीवर! खेड पुराच्या विळख्यात

आज रेड अलर्ट! शाळा-महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर : २४ तासांत १,४९३ मि.मी. पाऊस
Ratnagiri Rain
जगबुडी धोक्याच्या पातळीवर! खेड पुराच्या विळख्यात
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यावर पावसाचे संकट कायम असून, मुसळधार पावसानंतर खेडमधील पूरस्थिती सोमवारीही कायम राहिली. दुपारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १ हजार ४९३.७० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मंगळवारसाठी भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला 'रेड अलर्ट' जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्‍यान, अतिमुसळधार पावसाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने मंगळवारी ७ जुलै राेजीही शाळा-महाविद्यालयांना सलग दुसर्‍या दिवशीही सुट्टी जाहीर करण्‍यात आली आहे.

सर्वाधिक फटका खेडला

पुरामुळे सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसला आहे. जगबुडी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवर असून, मुख्य बाजारपेठ तब्बल १५ तासांहून अधिक काळ पाण्याखाली होती. अनेक दुकाने जलमय झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवाचा चौक परिसरात अजूनही पाणी साचले असून, शहराचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे. खेड–दापोली मार्गावरील वाहतूकही बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासन, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बचाव व मदतकार्यात गुंतल्या असून, विविध सामाजिक संस्था पूरग्रस्तांना अन्न, पिण्याचे पाणी व औषधांचे वितरण करत आहेत.

चिपळूणचा पुराचा धोका तूर्त टळला

चिपळूणमध्ये रविवारी वाशिष्ठी आणि शिव नदीने रौद्ररूप धारण करून सखल भागात पाणी शिरले होते. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने चिपळूणचा मोठा पुराचा धोका तूर्त टळला आहे. शहरातील बाजारपेठेत शिरलेले पाणी ओसरले असून पालिकेकडून चिखल व कचरा हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. व्यापाऱ्यांनी रात्रभर दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवला. मात्र, शहरासह अनेक भागांत वीजपुरवठा अद्याप खंडित असून, ग्रामीण भागात झाडे कोसळल्याने अनेक मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे.

राजापूरमध्येही पूर ओसरला

राजापूरमध्येही अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरानंतर सोमवारी पाणी ओसरू लागले. नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेतील चिखल व कचरा हटविण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकरी पुन्हा भातलावणीच्या कामात व्यस्त झाले असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. एसटीच्या रत्नागिरी विभागाच्या ६४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news