Ratnagiri rain damage |सावित्री खाडीवरील आंबेत पुलाला दोन बार्जेसची धडक; सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पुन्हा बंद!

सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश; बार्जेस हटविल्यानंतर पुलाची पाहणी करूनच वाहतुकीबाबत निर्णय
महाड ते आंबेतच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहात भरकटत आलेले वाळू वाहून नेणारे दोन मोठे बार्ज आंबेत पुलाला धडकले
महाड ते आंबेतच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहात भरकटत आलेले वाळू वाहून नेणारे दोन मोठे बार्ज आंबेत पुलाला धडकले
Published on
Updated on

मंडणगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत–म्हाप्रळ मार्गावरील सावित्री खाडीवरील आंबेत पुलाला सोमवारी पहाटे पुराच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या दोन मोठ्या बार्जेसनी धडक दिली. या बार्जेस पुलाच्या खालच्या भागात अडकून पडल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाच्या उपस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आदेश देत पुलावरील वाहतूक पुन्हा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पाऊस, सावित्री नदीला आलेला पूर आणि भरतीचे पाणी यामुळे महाड परिसरातून वाहत आलेल्या दोन बार्जेस पुलाखाली अडकल्या. घटनेनंतर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

दरम्यान, प्रशासनाने सुरुवातीला एकेरी वाहतूक सुरू केल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मुसळधार पाऊस आणि भरतीच्या पाण्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लेखी पत्र देऊन पुलावरील वाहतूक पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुलाखाली अडकलेल्या दोन्ही बार्जेस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्या हटविल्यानंतर पुलाची तांत्रिक पाहणी करून पुढील वाहतुकीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी दिली.

सध्या पुलावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून या मार्गावरील वाहनांची वाहतूक मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गामार्गे वळविण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून बार्जेस हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news