Ratnagiri News : रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची लूट; प्रसाधनगृहासाठी ५ रुपयांची वसुली

ठेकेदारावर कारवाई करण्याची युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
Ratnagiri News
रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची लूट; प्रसाधनगृहासाठी ५ रुपयांची वसुली
Published on
Updated on

रत्‍नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून प्रसाधनगृहात जाण्‍यासाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी कोंकण रेल्वे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील 'पे ॲन्ड युझ टाॅयलेट'च्या बोर्डावर लघुशंकेसाठी प्रति व्यक्ती ५ रुपये शुल्क लिहिले आहे. कंत्राटदाराकडून हे शुल्क प्रवाशांकडून सक्तीने वसूल केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे स्थानकांवर लघुशंकेची सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणे बंधनकारक आहे. मात्र, येथील कंत्राटदार नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

"दररोज हजारो प्रवासी, विशेषतः कोकणात येणारे चाकरमानी, महिला, वृद्ध आणि गरीब प्रवाशांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या नाकाखाली ही बेकायदेशीर वसुली सुरू असणे अत्यंत संतापजनक आहे," असे प्रसाद सावंत यांनी म्‍हटले आहे.

लघुशंकेसाठी आकारले जाणारे ५ रुपये शुल्क त्वरित बंद करून ही सुविधा मोफत करावी. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना लुटणाऱ्या कंत्राटदारावर कडक दंडात्मक कारवाई करावी. 'लघवीसाठी कोणतीही फी नाही, ही सुविधा मोफत आहे' असे फलक स्थानकावर ठळकपणे लावावेत, अशी त्‍यांनी मागणी केली आहे.

रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने प्रवाशांच्या हक्कासाठी स्थानकावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद आहे. जर यावर उचित कार्यवाही झाली नाही तर ठेकेदाराचा माणूस आतमध्ये दिसणार नाही असे प्रसाद सावंत यांनी स्पष्ट सांगितले. तसेच रेल्वे स्थानक रोड वरील दुभाजक मधील झाडे वाहन चालकांसाठी धोकादायक असल्याने ती झाडे आकारामध्ये तोडावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली. यावेळी रितेश लोखंडे, नीलेश पवार, साई गावडे, निखिल बने, ओमकार कारेकर उपस्थीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news