

मंडणगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत–म्हाप्रळ मार्गावरील सावित्री खाडीच्या पुलाला धडकलेल्या दोन बार्जेसपैकी एक बार्ज मंगळवारी रात्री उशिरा हटवण्यात प्रशासनाला यश आले. मात्र दुसरी बार्ज चिखलात अडकल्याने पुलावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे. बार्ज पूर्णपणे हटवल्यानंतर पुलाची तांत्रिक पाहणी करूनच वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे.
तहसीलदार ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरी बार्ज बाहेर काढण्यासाठी दोन हायड्रा बोटी घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. पुढील काही तासांत बार्ज हटवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तज्ज्ञांकडून पुलाच्या सुरक्षिततेची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. पुलाच्या धोका नसल्याचा अहवाल आल्यानंतरच वाहतूक पूर्णपणे पूर्ववत केली जाईल. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव अवजड वाहनांसाठी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा, दुचाकी लहान चारचाकी वाहनांना प्रशासनाच्या नियंत्रणाखाली एकेरी मार्गाने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. घटनास्थळी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जुलै महिन्यात वाळू उत्खननाचा हंगाम नसताना खाडीत बार्जेस कशा आल्या, त्या निष्काळजीपणे कोणी ठेवल्या आणि संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष का केले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलाचे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार, तसेच अपघातास जबाबदार असलेल्यांवर बंदर विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सलग दोन दिवस वाहतूक विस्कळीत झाल्याने रायगड-रत्नागिरीदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पुलावरील वाहतूक केव्हा पूर्ववत होणार, याकडे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.