

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात गुरुवार, 3 सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा मोठी दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. डोंगर उतारावरील माती, दगड आणि मोठमोठ्या शिळा रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा बंद झाली असून घाटातून प्रवास करणार्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यालगतच्या सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी असलेला संपर्क विस्कळीत झाला आहे.
रघुवीर घाट हा सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. घाटमाथ्यावरील अनेक गावांतील नागरिक शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ तसेच विविध कामांसाठी खेड शहरात ये-जा करत असतात. मात्र, दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे गावांतील नागरिकांची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक
मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी रस्ता पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत या मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.