

रत्नागिरी : वारा आणि पावसामुळे समुद्रातील वातावरण धोकादायक बनले आहे. बांगडा आणि म्हाकूळ चांगल्या प्रमाणात मिळत असतानाच पर्ससीन नेट मासेमारीची घडी विस्कटली गेली आहे. समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नौका सोमवारी बंदरात परतल्या. मंगळवारी बहुसंख्य पर्ससीन नौका बंदरातच उभ्या होत्या.
पर्ससीन नेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच जोरदार पाऊस असल्याने आणि खलाशी तांडेलांची पूर्ण तयारी न झाल्याने मासेमारीचे चार दिवस वाया गेले. त्यानंतर खोल समुद्रात 12 नॉटिकल मैल बाहेर जावून मासेमारी सुरू करण्यात आली. निर्यात होणारा बांगडा आणि म्हाकुळ समाधानकारक मिळत होता.
सोमवारपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली. समुद्रात जोरदार वारा आणि पावसामुळे समुद्र खवळलेला असल्याने एका दिवसापेक्षा अधिक दिवस मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या पर्ससीन मासेमारी नौकाना परत फिरावे लागले. समुद्रात 20 सप्टेंबरपर्यंत असे धोकादायक हवामान राहणार असल्याचा इशारा असल्याने या नौका बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे पावसाळी बंदीनंतरच्या सप्टेंबर महिन्यातील काही दिवस मासळीचा चांगला रिपोर्ट मिळत असतानाच पर्ससीन मासेमारीची पुन्हा घडी विस्कटली आहे.