Ratnagiri News : वीजवाहिन्यांच्या विळख्यात शाळा, अंगणवाड्या

13 अंगणवाड्या, 40 प्राथमिक मराठी शाळांवर धोक्याची टांगती तलवार; सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Anganwadi
अंगणवाडी
Published on
Updated on

आशिष कारेकर

गुहागर शहर : धोकादायक वीजवाहिन्या व वीजखांब यांच्यामुळे गुहागर तालुक्यातील अंगणवाड्या व प्राथमिक शाळांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न अजूनही सुटलेला नाही. 13 अंगणवाड्या तर 40 प्राथमिक मराठी शाळांवर वीजवाहिन्या व शाळेलगत असलेल्या वीज खांबांमुळे धोक्याची टांगती तलवार कायम असताना महावितरणकडून केवळ यातील मोजक्याच 7 ते 8 शाळांचा विषय तात्पुरता सोडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित शाळांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

अंगणवाड्या व जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा यांची दुरुस्ती, पुर्नबांधणी, शिक्षकांचा अभाव असे असंख्य विषय दरवर्षी चर्चिले जात असतात. आता यात धोकादायक वीजवाहिन्या, वीजखांब यांचा विषय गंभीर बनला आहे. याबाबत पंचायत समितीच्या महिला बालकल्याण व शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, शाळांवर टांगती तलवार ठरलेल्या वीजवाहिन्या व वीजखांब यांचा प्रश्न अजूनही धूळखात पडल्याचे सांगण्यात आले.

ऐन शिमगोत्सवात 22 मार्च 2019 रोजी गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील मराठी शाळेत मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज उभारत असताना लोखंडी पाईपाचा वीजवाहिन्यांना स्पर्श होऊन सातवीतील 13 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 12 वर्षांचा विद्यार्थी वीजेच्या धक्याने जबर जखमी झाला होता. या दुर्घटनेपासून गुहागर शिक्षण विभागाला जाग आली होती. यानंतर मराठी शाळा व अंगणवाड्यांची पाहणी करून वीजवाहिन्या व वीजखांबांपासून धोका असल्याचे आढळून आले होते.

या शाळांजवळील वीजवाहिन्या, वीजखांब इतरत्र हलवण्यासाठी गुहागर पंचायत समिती सभांमध्ये वारंवार हे विषय प्राधान्याने घेण्यात आले होते. वीज मंडळ गुहागर विभागाला पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र 7 ते 8 शाळांचा प्रश्न सोडवण्याव्यतिरिक्त महावितरणकडून अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वीजवाहिन्या व वीजखांब बदलण्याचा हा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे.

वीजवाहिन्यांचा धोका असलेल्या जिल्हा परिषद मालकीच्या अंगणवाड्यांमध्ये घर पाचेरीसडा, कवठेवाडी, भातगाव-गोळेवाडी, तवसाळ-तांबडवाडी, मळण-तळेकोंड, सुरळ, खोडदे खत मोहितेवाडी, पाटपन्हाळे-गणेशवाडी, वरवेली-मराठवाडी, वरवेली रांजणवाडी, मुंढर आग्रेवाडी, रुम्म कोतळूक-कावणकरवाडी शिगवणवाडी, कोतळूक किरवलेवाडी या शाळांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद मराठी शाळांच्या छतांसह बाजून वीजवाहिन्या गेल्या आहेत. यामध्ये आंबेरे खुर्द, कर्दे नं 2, दोडवली, पिंपर-सहाणवाडी, आबलोली नं. 1, आबलोली-पागडेवाडी, खोडदे-खापले डिंगणकरवाडी, असोरे, शिवणे नं. 2. कॉडशृंगारी उर्दू, पालशेत-काळेवठार, मळण नं. 1, वेळंब नं. 1, मळण-तळेकोड, पांगारीतर्फे वेळंब-खांबेवाडी, जानवले नं. 2. वेळंब नं.4, या शाळांचा समावेश आहे. कारूळ, जामसूत-पातेवाडी, पिंपर नं. 1, भातगांव वडाची, भातगाव-गोळेवाडी, कोळवली नं. 1. खोडदे-मोहितेवाडी, खोडदे-निवातेवाडी, असोरे, पाचेरीसडा नं.2. मासू नं. 1, पालशेत काळेवठार, पालशेत नं. 1, वेळंब नं. 1, मळण तळेकौड, जानवळे नं.3 या शाळांजवळ वीजखांब आहेत.

गुहागर पंचायत समिती महिला बालकल्याण विभागातर्फे व शिक्षण विभागाकडून या संदर्भात महावितरण गुहागर कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात येते.मात्र महावितरण गुहागर कार्यालयाकडून याबाबत ठोस कार्यवाही नसल्याने या धोकादायक वीज वाहिन्या व वीजखांब जैसे थे आहे. आणखी एखादा अपघात घडण्याची वाट महावितरणचे अधिकारी पहात आहेत का? असे पालक वर्गातून बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news