

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गोवंश वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रायपाटण परिसरात छापा टाकत दोन वाहनांतून 19 गोवंश जनावरांची वाहतूक रोखून त्यांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.या संदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओणी पाचल मार्ग तसेच अणुस्कुरा घाटात सकाळी पहाटे 3.30 ते सकाळी 5.55 या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी महिंद्रा जीनीओ (एम.एच. 04 एफपी 6424) या वाहनातून 8 जनावरे व आयशर प्रो 1059 (एम.एच. 07 एक्स 1511) या वाहनातून 11 जनावरे डांबून आणण्यात आली होती. ही जनावरे पाणी व खाद्याविना, दाटीवाटीने बांधून कत्तल करण्यासाठी वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी विनायक मनोहर भोईटे (रा. बेळगाव, कर्नाटक) समीर बाळासो मुजावर (रा. कोल्हापूर) तबरेज चाँदनीय्या ठाकूर (रा. रत्नागिरी) या तिघांवर प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, मोटार वाहन कायदा 1988, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, प्राण्यांची वाहतूक नियम 1978 अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 20 लाख 66 हजार रुपये किमतीची 2 वाहने व जनावरे जप्त केली आहेत . ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिग गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.