

राजापूर : राजापूर आगाराच्या पुणे ते राजापूर या एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या दागिने व कपड्यांच्या बॅगेचा शोध लावण्यात राजापूर पोलिसांना अवघ्या काही तासांतच यश आले आहे. त्याच एसटी बसमध्ये राहिलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतील साहित्य तपासल्यानंतर एका टी शर्टवर असलेल्या नावावरून ज्या व्यक्तीने ती बॅग नेली होती त्याचा शोध घेऊन ती हरवलेली बॅग पुन्हा मिळवत दागिन्यांसह त्या महिलेच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी बॅग व दागिने मिळाल्याने त्या महिलेने आपली फिर्याद मागे घेतली आहे.
अनुजा प्रशांत कांबळे (मूळ रा. पासार्डे, कोल्हापूर, सध्या रा. जैतापूर, राजापूर) यांचा २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान पुणे ते राजापूर एसटी बस (एमएच-१४ बीटी-२२७२) मधून प्रवास सुरू होता. बस कोल्हापूर ते राजापूर मार्गावर असताना पाचल येथे आल्या असता आपली बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पाचल येथेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. सीटवर ठेवलेल्या या बॅगेमध्ये २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन टॉप्स, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. तशी तक्रार दिली होती.
राजापूर पोलिसांनी राजापूर आगारातील गाडीची व गाडीतील प्रवाशांची तपासणी केली. यावेळी सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर एक बॅग गाडीत आढळली. पोलिसांनी ती बॅग उघडली व तपासणी केली असता त्यामध्ये काही वस्तू व कपडे आढळले. यात असलेल्या एका टी शर्टवर नाऊळ देववाडी तिठवली, वैभववाडी असे लिहिले होते. राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी तत्काळ या गावचे पोलिस पाटील हर्याण यांच्याकडून माहिती घेतली.
दरम्यान, राजापूर पोलिसांचे एक पथक त्या महिलेसह नाऊळ देववाडी तिठवली वैभववाडी येथे गेले. यावेळी प्रवासात गर्दीत ती व्यक्ती गडबडीत आपली बॅग गाडीत सोडून चुकून त्या महिलेची बॅग घेऊन उतरला होता. त्या व्यक्तीने ती बॅग होती तशीच त्या महिलेकडे पोलिसांसमोर परत केली. यानंतर राजापूर पोलिस ठाण्यात पो. नि. अमित यादव यांनी ती बॅग तपासली असता आतील सर्व सामान होते तसेच होते.