Ratnagiri Police : रत्नागिरी पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी ‘मिशन फिनिक्स’
रत्नागिरी ःरत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विशेषतः किशारेवयीन मुले व युवकांमध्ये अमली पदार्थाचे सेवन रोखणे, अमली पदार्थ विषयक गुन्हेगारी तसेच अमली पदार्थांचे सेवन व वितरणाचे जिल्ह्यातून समूळ उचचाटन करणे तसेच समाजात जनजागृती करण्यासाठी पोलिस दलाकडून नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख ‘मिशन फिनिक्स’ हा उपक्रम 25 मे 2025 पासून राबवण्यात येत आहे.
या अंतर्गत आतापर्यंत 48 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये रेड करुन एकूण 70 आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यामध्ये ब्राऊन हेरॉईन, चरस, गांजा इत्यादी विविध प्रकारचे अमली पदार्थ मिळून 32 लाख 73 हजार 989 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत 26 डिसेंबर 2025 रोजी ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष तथा रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने एनडीपीएस कायद्यांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2020 ते सन 2025 या कालावधीत एकूण दाखल 65 विविध गुन्ह्यातील गांजा, चरस, ब्राऊन हेरॉईन व एम.डी. असा एकूण (181 किलो 141 ग्रॅम 105 मिलिग्रॅम) मुद्देमाल सुरक्षितपणे महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी रांजणगाव, पुणे या ठिकाणी नेत जाळून यशस्वीरित्या नष्ट केला.
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ विरोधी विविध कृतिशिल उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. जसे स्थानिक नाट्यगट व कॉलेज विद्यार्थ्यांच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी (बस स्थानके, शाळा परिसर, चौक, महाविद्यालये) येथे पथनाट्य सादर करुन ड्रग्जविरोधी मोहिमेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसेच अनेक जनजागृतीपर उपक्रम जसे अमली पदार्थ मुक्त सायकल रॅली, बाईक रॅली, सार्वजनिक रॅली तसेच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेत युवकांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थासंबंधी कोणतीही माहिती,अडचण अथवा संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

