Ratnagiri News : पावस परिसरात आंबा उत्पादनात मोठी घट

महिन्याभरात पाच संकलन केंद्रांमधून केवळ अडीच हजार टन आंबा संकलित
Ratnagiri News
पावस परिसरात आंबा उत्पादनात मोठी घट
Published on
Updated on

पावस : रत्नागिरी हापूसच्या गड मानल्या जाणाऱ्या पावस परिसरात यंदा आंबा उत्पादनात मोठी घट झाली आहे. गेल्या महिन्याभरात पाच संकलन केंद्रांमधून केवळ अडीच हजार टन आंबा संकलित झाला असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. उत्पादन घटल्याने दरावरही परिणाम झाला असून स्थानिक प्रक्रिया उद्योगांना कच्चा माल मिळवताना कसरत करावी लागत आहे.

हापूस आंब्याचे प्रमुख उत्पादक क्षेत्र असलेल्या पावस परिसरात यंदाच्या हंगामात आंबा उत्पादनात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. १५ एप्रिलपासून सुरू झालेल्या पाच आंबा संकलन केंद्रांमधून गेल्या महिन्याभरात सुमारे २,५०० टन हापूस आंबा संकलित झाला. मागील वर्षी हाच आकडा ५,५०० टनांच्या घरात होता.

संकलित झालेल्या आंब्यापैकी ३० टक्के आंबा स्थानिक २० प्रक्रिया उद्योगांना पुरवण्यात आला, तर उर्वरित ६० टक्के आंबा परजिल्ह्यातील कॅनिंग फॅक्टरींना पाठवण्यात आला. पावस, गणेशगुळे, कुर्धे, मेर्वी या परिसरात हापूसची मोठ्या प्रमाणावर लागवड असून येथील नर्सरी व्यवसायही जुना आहे. त्यामुळे आंबा हे येथील प्रमुख नगदी पीक बनले आहे. वाढत्या मागणीमुळे परिसरात २० हून अधिक व्यावसायिकांनी आंबा प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. या उद्योगांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल लागतो. त्यासाठी दरवर्षी किलोवर आंबा खरेदी करणारी संकलन केंद्रे उभारली जातात. बागायतदार आपला आंबा या केंद्रांवर देतात आणि केंद्रामार्फत तो प्रथम स्थानिक उद्योजकांना, नंतर परजिल्ह्यातील कंपन्यांना दिला जातो.

यंदा हवामानातील बदलामुळे उत्पादन घटल्याने संकलन केंद्रात आवक कमी झाली. परिणामी हंगाम केवळ आठ ते दहा दिवस शिल्लक असल्याचा अंदाज आहे. सध्या आंब्याला ३५ रुपये किलो दर मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला बागायतदारांना चांगला दर मिळाला, मात्र कर्नाटक हापूस बाजारात आल्यानंतर स्थानिक आंब्याचे दर प्रक्रिया उद्योजकांनी कमी केले.

याबाबत पावस येथील मयूर मँगो सप्लायरचे संदीप बावस्कर म्हणाले, गेल्या महिनाभरापासून संकलन सुरू आहे. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने आवक घटली आहे. सुरुवातीला दर चांगला होता, मात्र अचानक आवक कमी झाल्याने बागायतदार अडचणीत आले. यंदा उत्पादन कमी असले तरी आणखी ८-१० दिवस आंबा उपलब्ध होईल, त्यानंतर हंगाम संपेल. उत्पादन घट, कर्नाटकी आंब्याची स्पर्धा आणि दरातील चढ-उतार यामुळे यंदाचा हंगाम बागायतदारांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news