Pawas Hapus : पावसचा हापूस मुंबईत दाखल!

फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात हंगामातील पहिली पेटी रवाना
Pawas Hapus
पावसचा हापूस मुंबईत दाखल!
Published on
Updated on

पावस : येथील आंबा बागायतदार शकील हरचिरकर यांच्या बागेतील हापूसची पाच डझन आंब्यांची एक पेटी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई बाजारात पाठवण्यात आली. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान हरचिरकर यांच्या बागेला मिळाला आहे.

या वर्षी पावसाळा लवकर सुरू होऊन तब्बल सहा महिने मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आंबा हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, नंतर थंडी योग्य वेळी आणि सातत्याने पडल्याने आंबा हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. परिणामी आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आला. योग्य नियोजन, वेळेवर फवारणी आणि काटेकोर बाग व्यवस्थापनामुळे हरचिरकर यांच्या बागेतील मोहोराचे चांगल्या प्रतीच्या फळांमध्ये रूपांतर झाले. 5 फेब्रुवारी 2026 रोजी हंगामातील पहिली पाच डझनांची पेटी मुंबईतील व्यापारी सोपान शंकर नलावडे यांच्या पेढीवर विक्रीसाठी पाठवण्यात आली. सध्या ही पेटी विक्रीसाठी उपलब्ध असून लवकरच चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

मागील वर्षीही पहिली पेटी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाठवल्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई बाजारात आवक वाढली होती आणि हंगाम समाधानकारक गेला होता. यावर्षीही हंगाम टप्प्याटप्प्याने सुरू राहील, असा विश्वास हरचिरकर यांनी व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, “ज्याप्रमाणे पालक आपल्या मुलाचे योग्य पालनपोषण करतो, त्याचप्रमाणे आम्ही बागेची वेळोवेळी साफसफाई, योग्य फवारणी आणि पोषक वातावरणाचा पुरेपूर उपयोग करतो. त्यामुळेच आम्हाला वेळेत, दर्जेदार हापूस मिळतो. प्रत्येक झाडाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे निसर्गही आम्हाला त्याचे गोड फळ देतो.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news