

रत्नागिरीः पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४५७ उमेदवारांचे २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या समुपदेशनाला दोन दिवसांची स्थगिती द्या आणि जिल्ह्यातच्या ज्येष्ठ पदवीधर शिक्षकांचे त्यांच्या सोयीच्या जागी समायोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता पवित्रमधील त्या शिक्षकांचे समुपदेशन २४ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात १ हजारहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त होती. पवित्र पोर्टलमधून ४७८ शिक्षक मिळाले होते. शिक्षण विभागाच्यावतीने सलग तीन दिवस सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१ उमेदवारांनी दांडी मारली होती. कागदपत्र पडताळणी होवूनही समुपदेशन लांबणीवर पडल्यामुळे पालक, उमेदवार चिंतेत होते. अखेर समुपदेशनाला २२ सप्टेंबर रोजीचा मुहूर्त मिळाला होता. शिक्षण विभागाच्या वतीने तयारी ही करण्यात आली होती. मात्र शिक्षक संघटनांनी पदवीधर शिक्षकांची समस्या पालकमंत्री सामंत यांच्यासमोर मांडली. त्यांना ४५ किमी पेक्षा अधिक लांबची शाळा मिळालेली आहे. त्यामुळे सोयीच्या ठिकाणी समायोजन करावे अशी मागणी केल्यामुळे पवित्र पोर्टलच्या समुपदेशनाला दोन दिवसांची स्थगितीचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी दिले आहेत.
दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. यामध्ये पदवीधर शिक्षकांच्या अडचणी पालकमंत्री सामंत यांनी समजून घेतल्या. जिल्ह्यातल्या ज्येष्ठ पदवीधर शिक्षकांचे त्यांच्या सोयीच्या जागी समायोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पवित्रमधील त्या शिक्षकांचे समुपदेशनाला दोन दिवसांच्या स्थगती दिली आहे. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे आदी उपस्थित होते.