Ratnagiri fire : नायरी-निवळी परिसरात उभ्‍या दुचाकीला अचानक आग

आगीचे कारण अस्पष्ट
Ratnagiri fire news
नायरी-निवळी परिसरात उभ्‍या दुचाकीला अचानक आग
Published on: 
Updated on: 

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नायरी-निवळी परिसरात मध्यरात्री उभी करून ठेवलेल्या नव्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला अचानक आग लागल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे निवळी परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून आगीचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

निवळी येथील भरत घडशी यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न (MH०८ BL ३४५२) ही दुचाकी या आगीत पूर्णपणे भस्मसात झाली. विशेष म्हणजे, घडशी यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजीच ही दुचाकी खरेदी केली होती. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांतच नव्या दुचाकीची अशी अवस्था झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरापासून काही अंतरावर असलेल्या पाखाडीजवळ घडशी यांनी नेहमीप्रमाणे दुचाकी उभी केली होती. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील एका वृद्ध महिलेच्या निदर्शनास दुचाकीला आग लागल्याचे आले. त्यांनी तातडीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले आणि घटनेची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच काही नागरिक भरत घडशी यांना उठवण्यासाठी गेले तर अन्य नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, आगीचा वेग प्रचंड असल्याने नागरिकांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. काही वेळातच संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली.

प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, दुचाकीतील तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली की अन्य कोणत्या कारणामुळे आग लागली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या घटनेची माहिती भरत घडशी यांनी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी संगमेश्वर पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आगीमागील नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दुचाकीला अपघाताने आग लागली की जाणीवपूर्वक आग लावण्यात आली, या दोन्ही शक्यतांच्या पार्श्वभूमीवर घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.