

पाचल : पाचलच्या इतिहासात प्रथमच तळवडे जि. प. गट, पाचल विभाग आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची विक्रमी दहीहंडी बांधण्यात आली. जिल्ह्यातील सर्वाधिक रकमेची दहीहंडी ठरलेल्या या उत्सवाचा थरार अनुभवण्यासाठी पाचल बाजारपेठेत गोविंदा प्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
सात थरांची ही दहीहंडी फोडण्यासाठी जिल्ह्याबाहेरील नामांकित गोविंदा पथकेही पाचलमध्ये दाखल झाली होती. ढोल-ताशांचा दणदणाट आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण बाजारपेठ दुमदुमून गेली. गोविंदा पथकांनी थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेले प्रयत्न उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.अखेर हनुमान प्रसन्न दिवटेवाडी, कालिका माता भू आणि न्यू हनुमान खडपेवाडी-मराजापूर या गोविंदा पथकांनी सात थरांची रचना करत दहीहंडी फोडली. या कामगिरीमुळे पाचलच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद झाली.
या ऐतिहासिक दहीहंडी उत्सवाला आमदार किरण सामंत आणि शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी भेट देऊन गोविंदा पथकांसह आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, आत्माराम सुतार, अमित साळवी, सिद्धार्थ जाधव, जि. प. सदस्य सिद्धाली मोरे, पं. स. सदस्या अपेक्षा मासये, समीक्षा वाफिलकर, सरपंच गायत्री साळवी, सुनील गुरव, संतोष सावंत, उदय राणे, रवींद्र सावंत, विहंग खानविलकर, हर्षद तेलंग, सिद्धेश नारकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजक व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत हा दहीहंडी उत्सव उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडला.