Ratnagiri News : पाचलमध्ये बंद घरात साडेसहा लाखांची घरफोडी

शिक्षक दाम्पत्य गणपती सुट्टीत गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांचा डल्ला
Robbery Case
Robbery CasePudhari File Photo
Published on
Updated on

राजापूर : गणपती सुट्टीसाठी शिक्षक दाम्पत्य आपल्या मूळ गावी गेले असताना पाचल-विद्यानगर येथील त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरफोडी केली. घरातील लोखंडी व लाकडी कपाटे, तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल सहा लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

पाचल येथील शिक्षिका सन्नू पिरजादे सरस्वती विद्यामंदिरमध्ये तर त्यांचे पती मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६) हे तुळसवडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहेत. गणपती सुट्टीच्या निमित्ताने पिरजादे दाम्पत्य १२ सप्टेंबर रोजी आपल्या मूळ गावी गेले होते. याच कालावधीत चोरट्याने त्यांच्या पाचल-विद्यानगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी व लाकडी कपाट, तिजोरी फोडून मौल्यवान ऐवज लंपास केला. पिरजादे कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे.

चोरीस गेलेल्या ऐवजात साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड मंगळसूत्र, डायमंड टॉप्स, मंगळसूत्र, हार, नेकलेस, अंगठ्या, चांदीच्या पैंजणाचा जोड तसेच १२ हजार रुपये यांचा समावेश आहे. याची एकूण किंमत सहा लाख ५० हजार १८५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव व पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपती सुट्टीच्या काळात घर बंद असल्याची संधी साधून ही घरफोडी करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news