

रत्नागिरी : गणेशोत्सवात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर कायमच होता. बुधवारपासून पावसाचा जोर ओसरला असून, गुरुवारी 54.64 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पाच दिवसांनंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले आहे. आतापर्यंत सरासरी 3 हजार 324.16 म्हणजेच 99 टक्के पावसाची नोंद झाली आहे. कोकणात पावसाचा जोर ओसरला, तरी जिल्ह्याला पुढील चार दिवसांचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पावसाची हजेरी लावली होती. लाडक्या बाप्पा बरोबरच वरुणराजानेही कोकणात दमदार एंट्री घेत धो-धो पाऊस बरसला. त्यानंतर सतत पावसाची हजेरी लावली. त्यामुळे चाकरमान्यांना शक्यतो घराच्या बाहेर पावसाने पडू दिले नाही. सात दिवसांच्या बाप्पाला ही निरोप देताना पावसाने दमदार हजेरी लावी. पावसात भिजतच गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून, सूर्यनारायणाने दर्शन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काहीसा उकाडा जाणवत आहे. सध्या जरी पावसाने उघडीप दिली, तरी हवामान खात्याकडून पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी, मंडणगड 4.मि.मी., खेड 9.28 मि. मी,दापोली 8.14 मि.मी, चिपळूण 3.56 मि.मी, गुहागर 3.60 मि.मी., संगमेश्वर 7.00 मि.मी., रत्नागिरी 6.11 मि.मी, लांजा 5.20 मि.मी., राजापूर 7.75 मि.मी. असे एकूण 54.64 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.