Ratnagiri News : चिपळूण उड्डाण पुलावरून एका मार्गावरून वाहतूक सुरू

सोमवारपासून पुलावरील विद्युतीकरण होणार पूर्ण
Ratnagiri News
चिपळूण उड्डाण पुलावरून एका मार्गावरून वाहतूक सुरू
Published on: 
Updated on: 

चिपळूण शहर : शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच प्रांताधिकारी कार्यालयापासून पुढे पंचायत समितीपर्यंतच्या मार्गावर उड्डाण पुलावर दोन ते वीस फुटांपर्यंत टाकलेल्या भरावाचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर डांबरीकरणदेखील केले असून, या रस्त्याची चाचणी घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी दोन तास हा पूल एकदिशा मार्गाने वाहतुकीस खुला करण्यात आला. तर शुक्रवारी (दि. २७) संपूर्ण दिवसभर मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी पूल वाहतुकीस खुला ठेवत भरावाची चाचणी घेण्यात आली.

गेली १७ वर्षे रखडलेल्या महामार्गाच्या कामामध्ये दिलासादायक बाब म्हणून शहरातून जाणारा बहुचर्चित उड्डाण पूल अखेर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे महिनाभरात खुला होणार आहे. दोन वर्षांपूर्वी बहुचर्चित पुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना हा पूल बहादूरशेख येथे कोसळला. त्यानंतर कामाचा दर्जा व पुलाच्या आराखड्यावरून टीका झाली. नवा आराखडा व कामाच्या दर्जावर लक्ष ठेवून बहादूरशेख ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाण पूल पूर्ण झाला आहे. त्यापुढे पंचायत समितीकडे सुमारे २० फुटांपासून २ फुटांपर्यंतचा भराव करण्याचे काम सुरू झाले. अखेर डिसेंबर महिन्यात पहिले पंधरा ते वीस दिवस या पुलावरून वाहतूक सुरू ठेवून भराव टाकून डांबरीकरण झालेल्या रस्त्याची तांत्रिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी दोन तास व शुक्रवारी संपूर्ण दिवस उड्डाण पुलावरून गोवा दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना हा मार्ग खुला करण्यात आला.

दरम्यान, गोवा दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेचा भराव व डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून येत्या चार दिवसांत हे कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे. या भरावावर पुन्हा डांबरीकरण केले जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूकडून वाहतूक भरावाच्या चाचणीसाठी मार्ग सुरू ठेवणार आहे. दोन दिवसांत पुलावरील विद्युत दिवे सुरू केले जाणार आहेत. तसेच भरावाच्या बाजूचे संरक्षक कठड्यांचे कामही पूर्ण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.