

रत्नागिरी ः मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी बावनदी येथील उतारात भरधाव ट्रेलरने आपल्या पुढील दुचाकी तसेच समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देत अपघात केला. या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना गुरुवार, 15 जानेवारी रोजी रात्री 11.15 च्या सुमारास घडली.
प्रणय रवींद्र काडगे (रा. शिरवली देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रेलरचालक मोहम्मद कासिम लियाज खान (48, रा. जि. नवादा, बिहार) याच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री संशयित ट्रेलरचालक मोहम्म्द खान हा आपल्या ताब्यातील ट्रेलर (एमएच 01 ईएम 2951) गोवा ते मुंबई हायवेने भरधाव वेगाने चालवत घेऊन जात होता. तो निवळी-बावनदी येथील उतारावर आला असता त्याने आपल्या पुढील दुचाकीला (एमएच 42 बीटी 4710) मागून धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला (एमएच 07 एजे 4324) समोरून जोरदार धडक दिली. यात टेम्पोचालक प्रणय काडगे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.