Ratnagiri News : निवळीत पुलाच्या भरावाच्या प्लेटस्‌‍ कोसळल्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांमध्ये संताप
Niwali bridge
निवळीत पुलाच्या भरावाच्या प्लेटस्‌‍ कोसळल्या
Published on
Updated on

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग कामातील निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. रत्नागिरीतील निवळी तिठा येथील पुलाच्या भरावाच्या साईडच्या सिमेंट प्लेटस्‌‍ अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेच्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुरावे देऊनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थानी केला.

या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी 10 दिवसांपूर्वीच, म्हणजेच 15 मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांना व्हॉटस्‌‍ॲपद्वारे सविस्तर माहिती दिली होती. महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम सिमेंटच्या प्लेटस्‌‍ कोसळण्यात झाला.

ज्या ठिकाणी या प्लेटस्‌‍ कोसळल्या, तो भाग निवळी तिठा येथील अत्यंत गजबजलेला परिसर आहे. या सर्व्हिस रोडवरून दररोज शाळेतील शेकडो विद्यार्थी, ग्रामस्थ आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. जर ही घटना शाळा सुटण्याच्या वेळी किंवा गर्दीच्या वेळी घडली असती, तर त्याला जबाबदार कोण राहिले असते? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

महामार्गाच्या कामात केवळ टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात लोकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. केवळ सिमेंटच्या प्लेटस्‌‍ पुन्हा बसवून हा प्रश्न सुटणार नाही, तर संपूर्ण पुलाच्या कामाची तांत्रिक तपासणी होणे गरजेचे आहे. जर तातडीने लक्ष दिले नाही, तर या सर्व्हिस रोडवरून प्रवास करणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर तरी झोपलेले प्रशासन जागे होणार का? की अजून मोठ्या अपघाताची वाट बघणार? असा प्रश्न परशुराम कदम यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news