Ratnagiri News : विद्यार्थ्यांना पावसात भिजतच गिरवावे लागणार धडे

जि. प.च्‍या १०० हून अधिक शाळा नादुरुस्‍त; आचारसंहितेमुळे शाळा, वर्ग दुरुस्‍तींची कामे थांबली
ZP School
ZP School
Published on
Updated on

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिलहा परिषदेच्‍या २ हजारांहून अधिक प्राथमिक विभागाच्‍या शाळा आहेत. यापैकी ७१ वर्गखोल्‍यांच्‍या दुरुस्‍तीसाठी ४ कोटी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्‍यातून काही वर्गखोल्‍या दुरुस्‍ती झाल्‍या आहेत. उर्वरित दुरुस्‍ती झालेली नाही. दरम्‍यान, विधान परिषदेची आचारसंहिता असल्‍यामुळे निधीअभावी शाळा दुरुस्‍तींचे काम थांबले आहे. त्‍यामुळे ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना भिजत अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत.

एकीकडे ग्रामीण भागातील शाळांचे विद्यार्थी वाढवण्यासाठी प्रयत्‍न केले जात आहे. त्‍यासाठी शिक्षकांना वाड्यावाड्यांमधून फिरावे लागत आहे. दुसरीकडे या शाळांच्‍या दुरुस्‍तीची समस्‍या कायम आहे. अनेक शाळा जुन्‍या झाल्‍या आहेत. काही धोकादायक शाळांच्‍या इमारती आहेत. वादळामुळे कित्‍येक शाळांचे नुकसान झाले आहे.

मात्र तत्‍काळ दुरुस्‍ती होत नसल्‍याचे चित्र आहे. सद्यस्‍थितीत जिल्‍ह्यातील १०० पेक्षा अधिक शाळा नादुरुस्‍त आहेत. त्‍यांच्‍या दुरुस्‍तीबाबत प्रस्‍ताव जिल्‍हा परिषदेने पालकमंत्री उदय सामंत यांच्‍याकडे दिला होता. जिल्‍हा वार्षिक योजनेतून ७६ शाळांमधील वर्गखोल्‍यांच्‍या दुरुस्‍तीसाठी ४ कोटी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. २९ वर्ग खोल्‍यांच्‍या दुरुस्‍तीची कामे झाली आहेत, तर उर्वरित कामे थांबली आहेत.

पावसाळा येणार असून शाळाही १५ जूनपासून सुरू होणार आहे. आचारसंहितेमुळे निधीची मंजुरी घेता येईना. त्‍यामुळे शाळा दुरुस्‍तीचे काम रखडले आहे. त्‍यामुळे पावसाळ्यात अनेक शाळा गळत असल्‍याने विद्यार्थ्यांना शाळेत दफ्‍तर घेऊन बसावे लागणार आहे.

सध्या जिल्‍ह्यात विधानपरिषदेची आचारसंहिता सुरू आहे. त्‍यामुळे शाळा दुरुस्‍तीचे काम थांबले आहे. जिल्‍ह्यातील किती शाळांची पडझड, नुकसान, दुरुस्‍ती बाकी आहे त्‍याची माहिती घेणे सुरू आहे. अति तातडीच्‍या शाळा दुरुस्‍तीसाठी चर्चा सुरू आहे. त्‍यासंदर्भात सोमवारी बैठक होणार असून शाळा दुरुस्‍तीवर मार्ग निघेल.
- चंद्रकांत सूर्यवंशी, उपशिक्षणाधिकारी, जि.प. रत्‍नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news